AurangabadNewsUpdate : औरंगाबाद : पाणी पुरवठ्यातील अडथळे दूर झाल्याचा पालकमंत्र्यांचा दावा…

मुंबई : औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्यात आली आहेत. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे व पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उपाययोजनांची माहिती घेतली असून औरंगाबादच्या . पाणी पुरवठ्यातील अडथळे दूर झाल्याचा दावा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे.
याबाबतच्या माहिती पत्रकात शासनाने म्हटले आहे कि , हर्सुल तलावातून 4 द.ल.लि. मिळणाऱ्या पुरवठ्यात वाढ करुन 10 द.ल.लि. पाणी घेण्याचे ठरले तसेच गारखेडा विभागात 1800 मीटर लांबीची जलवाहिनी तातडीने टाकण्याचे नियोजन करण्यात आले. पाणी उचलण्याच्या मार्गातील अडथळे पाणबुड्यांच्या सहाय्याने दूर करण्यात आले. राज्याच्या पाणी पुरवठा विभागाचे सचिव संजीव जैयस्वाल यांच्याकडे पालकमंत्र्यांनी महापालिकेस मदत करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील ज्येष्ठ अभियंत्यास उसनवारी तत्वावर नियुक्ती द्यावी अशी सूचना केली व ती मान्य करण्यात आली. पालकमंत्री व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून शहरासाठी देण्यात येणाऱ्या पाण्यात वाढ करण्याची सूचना केली.
सध्या महामंडळाकडून दररोज 1 द.ल.लि. पाणी दिले जाते, त्यात वाढ करून 3 द.ल.लि. देण्याचे नियोजन केले जात आहे. एकंदरीत वाढत्या उन्हाच्या त्रासात नागरिकांना होणारा पाणी पुरवठा वाढावा यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरु आहेत व येत्या आठवड्यात त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला.