MaharashtraPoliticalUpdate : महाविकास आघाडीबाबत राजू शेट्टी यांच्या ‘स्वाभिमानी’चा मोठा निर्णय …

कोल्हापूर : नको ती तुमची आमदारकी , राज्यपाल नियुक्त यादीतून माझे नाव वगळा असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये संघटनेच्या राज्यकार्यकारणी बैठकीत ही घोषणा केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे राज्य प्रवक्ता रणजित बागल यांनी माध्यमांना हि माहिती देऊन आता आम्ही स्वतंत्र आहोत असे सांगितले.
दरम्यान, राजू शेट्टी यांनी याआधीच मविआतून बाहेर पडण्याचा सूचक इशारा दिला होता. “महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सामुदायिक निर्णय होता. येत्या ५ एप्रिलला राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल,” या शब्दांमध्ये राजू शेट्टीं यांनी महाविकास आघाडी सोडण्याबाबत शुक्रवारी सूचक इशारा दिला होता. अखेर त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
आघाडी सरकारचा सभागृह नेता म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करताना सूचक म्हणून माझे नाव घेतले होते. कारण त्यांना स्वाभिमानीने अनेक वर्षांपासून जपलेले नैतिक अधिष्ठान हवे होते. आघाडी सरकारला अडीच वर्ष होत आली तरी ज्या किमान समान कार्यक्रमावर आघाडी अस्तित्वात आली त्याचे पुढे काहीच झाले नाही. नवीन धोरण राबवत असताना मित्रपक्षांना विचारले जात नाही. आघाडी सरकारचं समीक्षण करण्याची आता वेळ आली आहे, असे शेट्टी म्हणाले होते.
भाजप शेट्टींच्या पाठिंब्यासाठी आग्रही
दरम्यान महाविकास आघाडीच्या कारभाराला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे कंटाळले आहेत. याबाबत भाजपाची कोणती भूमिका राहील? या प्रश्नावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांचे स्वागतच केले जाईल, असे उत्तर दिले. तर कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी राजू शेट्टी यांनी भाजपाला पाठिंबा द्यावा यासाठी पदाधिकाऱ्यांनी जयसिंगपूर येथे त्यांची भेट घेतली. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे आदींचा समावेश होता. मात्र यावर शेट्टी यांच्याकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.