Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaWorldNewsUpdate : श्रीलंका भीषण आर्थिक संकटात , भारताने कसा पाळला पहा शेजारधर्म !!

Spread the love

नवी दिल्ली : शेजारी देश श्रीलंका सध्या सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात असल्याचे चित्र दिसताच भारताने शेजारधर्म म्हणून 40,000 टन डिझेलची पहिली खेप श्रीलंकेच्या किनाऱ्यावर पोहोचवली आहे. क्रेडिट लाईनखाली भारताने श्रीलंकेला हि खेप पाठवली आहे. श्रीलंकेत प्रदीर्घ वीज कपात , इंधनाची कमी आणि खाण्यापिण्याच्या  जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्यामुळे जाळपोळ, हिंसाचार, निदर्शने, सरकारी मालमत्तेची तोडफोड करण्यात आली. तर देशातील बिघडलेली परिस्थिती पाहून राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी आणीबाणी लागू केली आहे.

श्रीलंकेत १ एप्रिलपासून आणीबाणी लागू करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात देशात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. दरम्यान तुरळक निदर्शने टाळण्यासाठी पोलिसांनी ५० हून अधिक लोकांना अटक करून शुक्रवारी कोलंबो आणि आसपासच्या भागात संचारबंदी लागू केली.

देशाच्या आर्थिक दुर्दशेला सध्याच्या सरकारची धोरणे जबाबदार आहेत, असे श्रीलंकेतील सामान्य जनतेला वाटते, त्यामुळे कोलंबोमध्ये हिंसाचाराचे सत्र  सुरूच आहे. सरकारच्या धोरणांविरोधात लोकांनी शासकीय वाहनांना आगीच्या भक्ष्यस्थानी लोटून दिले. 1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. सध्या तर  देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. राष्ट्रपती राजपक्षे यांनी त्यांच्या सरकारच्या कृतींचा बचाव करताना  म्हटले आहे की, परकीय चलन संकट हे त्यांचे योगदान नव्हते. आर्थिक मंदी मुख्यत्वे साथीच्या रोगामुळे आली असून श्रीलंकेचे पर्यटनही उद्ध्वस्त झाले.

दरम्यान कोलंबोमध्ये 13-13 तास वीजपुरवठा खंडित झाल्याने लोक रस्त्यावर उतरले असून ते राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. लोकांसह खाद्यपदार्थांचाही तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्याचबरोबर खाद्यपदार्थांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. परकीय चलनाच्या कमतरतेमुळे श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या आर्थिक संकटात इंधनासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. स्वयंपाकाच्या गॅसचाही तुटवडा निर्माण झाला आहे. सरकारच्या गलथान कारभारामुळे परकीय चलनाचे संकट अधिक गंभीर झाले असल्याचे सरकारच्या विरोधात आंदोलनात सहभागी झालेल्यांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तूंच्या तीव्र टंचाईचा सामना करत असलेले श्रीलंकेतील लोक शुक्रवारी रात्री कोलंबोमध्ये रस्त्यावर उतरले. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या घराकडे 5000 हून अधिक लोकांनी रॅली काढली. यादरम्यान जमावाची पोलिसांशी झटापट झाली, त्यानंतर अनेकांना अटक करण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!