AurangabadNewsUpdate : आले जिल्हाधिकारी आणि ‘एसपी’च्या मना … आणि वाळू माफियांची झाली दैना ….!!

बेकायदा वाळू उत्खनन केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांची कारवाई । बेवारस ट्रॅक्टरही दिले पेटवून…
औरंगाबाद : स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला कोणतीही माहिती न देता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व पोलीस अधीक्षक निमित्त गोयल यांनी स्वतः विशेष पथक तयार करून गुरूवारी मध्यरात्री मौजे पाटेगाव, तालुका पैठण शिवारातील गोदावरी गोदावरी पात्रात वाळू माफियांवर कठोर कारवाई केली. विशेष म्हणजे रात्रीच्या अंधारातच या पथकाने दीडशे ब्रास वाळूसाठा जप्त करून तस्करीसाठी वापरले जाणारे दोन बेवारस ट्रॅक्टर, केणी मशीन व इतर साहित्य जाळून नष्ट केले. मात्र या पथकाच्या कोणीही वाळू तस्कर हाती लागले नाही हे उल्लेखनीय… !! विशेष म्हणजे घटनास्थळावर मोठी हायवा ट्रकही छायाचित्रात दिसून येत आहे .
गोदावरीच्या नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने दिनांक 31/03/2022 रोजीच्या मध्यरात्री जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, पोलीस अधीक्षक निमीत गोयल, यांनी स्वतः डॉ.स्वप्नील मोरे, उपविभागीय अधिकारी, पैठण-फुलंब्री व त्यांच्या पथकाबरोबर, मौजे पाटेगाव शिवारातील गोदावरी नदी पात्रात जाऊन बेकायदा वाळू उत्खनन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली.
दोन ट्रॅक्टरलाही दिले पेटवून
ज्यावेळी पथक तिथे पोहोचले, त्यावेळी गोदावरी नदीपात्रामध्ये विना क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर वायर रोप व यारी मशीन द्वारे केनच्या सहाय्याने वाळू उपसा करताना आढळून आले. सदर ठिकाणी अंदाजे 150 ब्रास वाळू साठा उत्खनन केल्याचे दिसून आले. सदर 150 ब्रास वाळू साठा जप्त करून मौजे पाटेगाव येथील तलाठी यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पथक ज्यावेळी तिथे पोहचले, त्यावेळी दोन ट्रॅक्टर, यारी यंत्र हे विना क्रमांकाचे बेवारस असल्याने व बेकायदेशीर उत्खनन करत असल्याने त्यांचा भविष्यात पुन्हा बेकायदेशीर वाळू उपसा करण्यासाठी वापर होऊ नये म्हणून त्यांना आग लावून ते नष्ट करण्यात आले.
वाळू तस्करी करणाऱ्यांनी ठोकली धूम….
दरम्यान यापुढेही अवैध वाळू उपसाविरुद्ध अशीच सक्त कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे . विशेष म्हणजे पैठण तालुक्यातील गोदावरी पात्रातील एकाही वाळुपट्ट्याचा लिलाव झालेला नाही.तरीही तस्करांकडून वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच गुरुवारी मध्यरात्री जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमीत गोयल, उपविभागीय अधिकारी डॉ.स्वप्नील मोरे यांच्यासह पथकाने पाटेगाव शिवारातील गोदावरी नदी पात्रात हि धाड टाकली. या पथकाला पाहताच वाहने व साहित्य तेथेच सोडून अंधारात गोदावरी पात्रातील पाण्यात उड्या मारून वाळू तस्करी करणाऱ्यांनी धूम ठोकली.
दरम्यान जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक पथकासह कारवाईसाठी नदीपात्रात उतरेपर्यंत तस्करांच्या यंत्रणेला खबर मिळाली नाही. यामुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, यापुढे तस्करावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे. दरम्यान, पथकाची कारवाई सुरु असल्याचे समजताच पैठण ते हिरडपुरी दरम्यान रात्री सुरू असलेला अवैध वाळू उपसा बंद करून तस्कर फरार झाले.