Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावरही फिरला ‘ईडी’चा हात , ११ फ्लॅट जप्त , शरद पवार यांनी उडवली खिल्ली

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबरच शिवसेनेच्या नेत्यांवरही ईडी कडून कारवाई केली जात असताना आधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींवरील कारवाईनंतर आता ईडीने मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. आज उघडकीस आलेल्या एका प्रकरणात ईडीने पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेडच्या नीलांबरी प्रॉजेक्टसमधील ११ फ्लॅट जप्त केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खा. शरद पवार यांनिहीही आपली तीव्र प्रतिक्रिया दिली असून हे सर्व सुडाचे राजकारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


राज्यात ईडी आणि आयकर खात्याकडून अनेक राजकीय नेते आणि त्यांच्या नातेवाईकांवर मोठ्या प्रमाणात धाडी टाकण्यात येत आहेत. यामध्ये मुख्यत्वेकरून सत्ताधारी पक्षला टार्गेट केले जात असल्याची टीका शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केली जात आहे. याच मालिकेत आज ईडीने प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अर्थात रश्मी ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. यामध्ये ठाण्यातल्या वर्तक नगर भागातील ‘निलांबरी’ अपार्टमेंटमधील एकूण ११ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. या सदनिका आणि एकूण जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे ६ कोटी ४५ लाख रुपये असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.

दरम्यान या कारवाईवरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करून राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि , “उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं कारवाई केली आहे. शेल कंपन्यांच्या माध्यमातून हा घोटाळा झाला असून त्यासंदर्भात ईडीनं मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे. घोटाळेबाजांना सोडणार नाही”.

काय आहे प्रकरण ?

यासंदर्भात ईडीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुष्पक ग्रुपची एक कंपनी असलेल्या पुष्पक बुलियनच्या माध्यमातून श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिडेटनं खरेदी केलेल्या ११ सदनिका ताब्यात घेण्यात आल्या आहेत. साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आहे. नंदकिशोर चतुर्वेदी नावाचा एक एंट्री ऑपरेटर असून त्याच्या माध्यमातून ३० कोटींचं कर्ज साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड यांना शेल कंपन्यांच्या माध्यमातून ट्रान्सफर केलं गेलं. त्याच पैशातून या ११ सदनिकांची खरेदी केली गेली, असा आरोप आहे. तसेच, भविष्यात श्रीधर पाटणकर यांची देखील ईडीच्या माध्यमातून चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याआधी ईडीने पुष्पक बुलियन आणि ग्रुप ऑफ कंपनीजविरोधात ६ मार्च २०१७ रोजी आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला होता. तसेच, याआधीच ग्रुपच्या मालकीची २१ कोटी ४६ लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त करम्यात आली होती. पुष्पक ग्रुपशी संबंधित महेश पटेल यांनी पुष्पक ग्रुपशी संबंधित २०.०२ कोटींचा निधी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या शेल कंपन्यांकडे ट्रान्सफर केला. त्यांनी पुढे एकूण ३० कोटींचा निधी त्यांची अजून एक शेल कंपनी हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून असुरक्षित कर्ज स्वरूपात श्री साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिडेटकडे ट्रान्सफर केला. त्यामुळे महेश पटेल यांच्याकडून आलेला निधी साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून रीअल इस्टेटमध्ये गुंतवण्यात आला. याच पैशातून ठाण्याच्या निलांबरी अपार्टमेंटमधील ११ सदनिका खरेदी करण्यात आल्याचा ईडीला संशय आहे.

शरद पवार यांनी उडविली ईडीची खिल्ली

दरम्यान या कारवाईवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही कारवाई म्हणजे कुणाला तरी त्रास द्यायचा म्हणून सुरु असलेला खेळ आहे, अशा शब्दात त्यांनी ईडीचा समाचार घेतला. केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर हा देशासमोरील महत्त्वाचा प्रश्न आहे. गेली काही वर्षे विरोधकांना दाबवण्यासाठी सत्ताधारी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करतो आहे. कुणाला तरी त्रास द्यायचा म्हणून कारवाया सुरु असल्याचे दिसतेय, असे निरीक्षण शरद पवार यांनी नोंदवले आहे.

महाराष्ट्रात ईडीचा अॅक्टिव्हनेस बघता शरद पवार यांनी ईडीची खिल्ली उडवली. ५ ते १० वर्षांपूर्वी लोकांना ईडी नावाची संस्था माहितीही नव्हती. मग ती संस्था काय काम करते, ही तर फार लांबची गोष्ट, पण आता कुणाला तरी टार्गेट करायचं, कुणाला तरी त्रास द्यायचा म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर होतो आहे. आता ही ईडी गावागावात गेलीय, अशा शब्दात पवारांनी ईडी खिल्ली उडवली म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!