Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RussiaUkraineWarUpdate : आज दिवसभरात : युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान मोदींशी साधला संवाद

Spread the love

नवी दिल्ली : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियासोबतच्या भीषण युद्धादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. युक्रेनच्या पंतप्रधानांचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी शनिवारी ट्विट करून पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या संभाषणाची माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी पंतप्रधान मोदींकडे आपण राजकीय पाठिंबा मागितला आहे. झेलेन्स्की म्हणाले की, एक लाखाहून अधिक सैनिकांसह रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्याबाबत मी पंतप्रधान मोदींना माहिती दिली.

दरम्यान त्याच वेळी, भारतातील रशियन मिशनने ट्विट करून भारताची युएन मधील भूमिका ‘मुक्त आणि संतुलित’ आणि अत्यंत प्रशंसनीय असल्याचे वर्णन केले. तर पंतप्रधान कार्यालयाने , पीएम मोदींनी युक्रेनमधील विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली असून भारतीयांच्या सुरक्षित प्रवासासाठी त्यांनी युक्रेन प्रशासनाकडे तातडीने मदत मागितली आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या देशातील सद्यस्थितीबद्दल सांगितले. सुरू असलेल्या संघर्षामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल पंतप्रधान मोदींनी तीव्र दु:ख व्यक्त केले. दोन्हीही देशांनी  हिंसाचार त्वरित थांबवण्याच्या आवाहनासह त्यांनी संवादाच्या मार्गावर परतण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, भारत शांतता प्रयत्‍नांसाठी कोणत्याही प्रकारे मदत करण्यास तयार आहे. चीन आणि युएई प्रमाणे भारताने युनोच्या  सुरक्षा परिषदेत निंदा प्रस्तावादरम्यान मतदान केले नाही, तर ११ सदस्यांनी रशियाच्या विरोधात मतदान केले. सुरक्षा परिषदेतील  भारताच्या या  भूमिकेचे रशियाने कौतूक  केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली आहे.

रशियन सैन्य नागरी भागांना लक्ष्य करणार नाही

दरम्यान शुक्रवारी रशियाने किव्हवर हल्ला केल्याचे वृत्त फेटाळले असून रशियन सैन्य नागरी भागांना लक्ष्य करणार नाही, असे स्पष्ट केले केले असले तरी रशियन सैन्य सतत पुढे सरकत असून, युक्रेनियन भूमीवर हल्ला करत आहे. एकीकडे हे सैन्य आता राजधानी किव्हपासून थोड्याच अंतरावर असून युक्रेनियन सैनिक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनशी वाटाघाटी करण्याच्या रशियाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

युरोपियन युनियनकडून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांची संपत्ती लवकरच जप्त केली जाऊ शकते. २७ देशांच्या युरोपियन युनियनकडून या संदर्भात तसा करार केला जात असल्याचा दावा लक्झेंबर्गचे परराष्ट्र मंत्री जीन एसेलबोर्न यांनी शुक्रवारी केला आहे. तसेच युक्रेन सरकारने शुक्रवारी दावा केला की, रशियाने पिवडेनीच्या काळ्या समुद्रातील बंदराजवळ दोन विदेशी जहाजांवर गोळीबार केला आहे त्यामुळे वातावरण अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, रशियन सैन्य युक्रेनची राजधानी किव्हकडे वेगाने पुढे सरकत आहे. सैन्य आता किव्ह शहराच्या केंद्रापासून फक्त ३० किमी अंतरावर आहे. युक्रेनच्या सशस्त्र दलांनी देशभरात जोरदार प्रतिकार सुरू ठेवला आहे. एएफपीच्या वृत्तानुसार,१००,००० युक्रेनियन नागरिकांनी सीमा ओलांडून पोलंडमध्ये प्रवेश केला आहे. तर रशियन हल्ल्यात १९८ नागरिक ठार, १००० हून अधिक जखमी झाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!