AurangabadNewsUpdate : औरंगाबादचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांना पोलीस पदक

औरंगाबाद : औरंगाबाद येथील सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारच्यावतीने पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. औरंगाबाद पोलिसांच्या दृष्टीने हि गौरवाची बाब मानली जात असून त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ३१ मार्च १९९५ रोजी माळाळे यांची पोलीस पोलिस खात्यात सरळसेवा भरतीनुसार निवड झाली होती.
प्रारंभी नागपूर येथे व नंतर गडचिरोली येथे कर्तव्य बजावले. यावेळी नागपूर येथील कार्यकाळात त्यांची नक्षलवाद्यांसोबत चकमकही झाली होती. त्यांनी अत्यंत दुर्गम भागातील जांबिया गट्टा येथे तीन वर्षे सलग सेवा दिली आहे. शाखेत कार्यरत असताना त्यांनी आरोपी शेखर सुरेश वानखेडे याच्याकडून सहा ऑटोमॅटिक पिस्टल जप्त करण्याची कामगिरी पार पाडली होती. या आरोपीने पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये अत्यंत दहशत माजवून खंडणी वसूल केलेल्या होत्या. दरम्यान सन २००४ मध्ये औरंगाबाद येथे अट्टल गुन्हेगाराने त्यांच्यावर तलवारीने हल्ला केल्यामुळे आरोपी विलास शहाजी सुरडकर यास स्वसंरक्षणार्थ गोळी मारली हाेती.
याशिवाय जालना येथे नेमणुकीस असताना वेल्फेअर अॅक्टिव्हिटीज अंतर्गत पोलिसांकरिता उभारण्यात आलेल्या शोभा प्रकाश मंगल कार्यालयाच्या बांधणीमध्ये सिंहाचा वाटा होता. CID CRIME-CCTNS मध्येही त्यांनी भरीव कामगिरी केली होती त्याची दखल एनसीआरबी डायरेक्टर न्यू दिल्ली यांनी घेऊन प्रशस्तीपत्र दिले होते.पोलिस ट्रेनिंग जालना येथे असताना पोलीस पोलिसांकरिता शिकवण्यात येणारा अभ्यासक्रम हा डिजिटलाईज केला होता त्याबद्दल उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून पोलीस महासंचालक यांनी प्रशस्तीपत्र देऊन पोमस कार्यालय मुंबई येथे सत्कार केला हाेता. सध्या सातारा येथे कार्यरत असताना त्यांनी सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुहेरी खून खटल्यामधील आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक किलो सोने हस्तगत केले होते.२०२० मध्ये याबद्दल पोलिस महासंचालक यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला होता .