OmicronIndiaUpdate : देशात ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या झाली पाच , नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

नवी दिल्ली : ओमायक्रॉनचा दिल्लीतही पहिला रुग्ण आढळून आला असून देशातील या रुग्णांची एकूण संख्या आता 5 झाली आहे. ओमायक्रॉनचे पहिले दोन रुग्ण बंगळुरूमध्ये नोंदवण्यात आले होती. त्यापैकी एक रुग्ण खासगी व्यवसाय करणारा डॉक्टर आहे तर दुसरा रुग्ण दक्षिण आफ्रिकेतील होता जो बरा होऊन त्याच्या देशात सुखरूप पोहोचला आहे त्यामुळे या रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने घाबरण्याचे कारण नसले तरी प्रत्येक नागरिकाने काळजी घेणे गरजेचे आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, महाराष्ट्र , गुजरात आणि कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून भारतात आत्तापर्यंत ओमायक्रॉनची पाच प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. दरम्यान तीन पेक्षा जास्त प्रकरणे असलेले क्षेत्र कर्नाटकात क्लस्टर म्हणून वर्गीकृत करण्यात येणार आहे. सध्या देशातील प्रौढ लोकसंख्येपैकी 50% पूर्णपणे लसीकरण झाले असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
दिल्लीत आढळून आलेल्या ओमायक्रॉन कोविड व्हेरिएंट रुग्णाविषयी माहिती देताना आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी म्हटले आहे कि , भारतीय वंशाचा एक माणूस काही दिवसांपूर्वी टांझानियाहून दिल्लीत आला होता त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. एकूण रुग्णांपैकी एक दिल्ली , एक महाराष्ट्रात, एक गुजरातमध्ये आणि दोन कर्नाटकात नोंद झाली आहे.
ताज्या माहितीनुसार भारतात रविवारी 2,796 मृत्यूची नोंद झाल्यामुळे देशातील कोरोनामुळे मृत झालेल्या एकूण मृतांची संख्या 4,73,326 वर पोहोचली, तर 8,895 नवीन संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार रविवार. सकाळी 8 वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील कोविड-19 प्रकरणांची एकूण संख्या 3,46,33,255 पर्यंत झाली आहे.
मुंबईत, दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमधून भारतात आलेल्या ३३ वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली. तर 28 नोव्हेंबर रोजी झिम्बाब्वेहून गुजरातमध्ये आलेल्या 72 वर्षीय अनिवासी भारतीय व्यक्तीला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे आढळून आले.