MumbaiNewsUpdate : ‘एनसीबी’च्या आर्यनवरील कारवाईत दिसलेल्या के.पी. गोसावीच्या मागावर आता पुणे पोलीस…

पुणे : एनसीबीने केलेल्या क्रूझवरील कारवाईनंतर झोतात आलेल्या के. पी. गोसावी नामक एनसीबीसोबत आर्यनखानला अटक करणाऱ्या व्यक्तीच्या शोधात आता पुणे पोलीस निघाले असल्याचे वृत्त आहे. एनसीबीशी कुठलाही संबंध नसताना बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला पकडून एनसीबी कार्यालयात नेत असल्याचे गोसावीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस एका फसवणुकीच्या प्रकरणात त्याचा शोध घेतअसल्याचे वृत्त आहे.
दरम्यान भाजप कार्यकर्ता मनीष भानुशाली आणि के . पी . गोसावी यांच्या या कारवाईत सहभागाबद्दल राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांची सर्वत्र चर्चा सुरू झाली. या दोघांपैकी के . पी . गोसावी हा स्वत:ला खासगी गुप्तहेर म्हणवून घेत असून हाच गोसावी आता पुणे पोलिसांना एका फसवणुकीच्या गुन्ह्यात हवा आहे.
पुणे पोलिसांच्या माहितीनुसार के. पी. अथवा किरण गोसावी याच्याविरोधात सन २०१८ मध्ये पुण्यातील एका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील एका तरुणाने के. पी. गोसावी याच्या विरोधात सन २०१८ मध्ये पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार गोसावी याने एका तरुणाला मलेशियात नोकरी लावतो असे आमिष दाखवून ३ लाख रुपये उकळले होते. २०१८ पासून पुणे पोलिसांना के. पी. गोसावी हवा आहे. मात्र तो सापडत नव्हता. दरम्यान ड्रग पार्टीवरील छापेमारीनंतर तो अचानक दिसला. एनसीबीच्या बड्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेला आणि आपल्या गाडीवर पोलिसांची पाटी लावून फिरणारा गोसावी आतापर्यंत पुणे पोलिसांना गुंगारा देऊन राजरोस फिरत होता का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबरोबरच एनसीबीच्या बड्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेला गोसावी पुणे पोलिसांना कसा सापडला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुणे पोलिसांना हवा असलेला हा गोसावी हा केपीजी ड्रिम्स रिक्रुटमेंट कंपनीचा मालक असल्याचीही पोलिसांची माहिती आहे. या कंपनीचे मुंबई आण नवी मुंबईत कार्यालये आहेत. गोसावी हा खासगी गुप्तहेर असल्याचेही सांगितले जात आहे. त्याची बड्या पोलिस अधिकाऱ्यांशी ओळख आहे. गोसावी हा स्वत:च्या गाडीवर पोलिसांची पाटी लावून फिरत असतो. शिवाय त्याचे पिस्तूल घेऊन फोटोही प्रसिद्ध असल्याचे नवाब मलिक यांनी आरोप करताना सांगितले आहे.