MaharshtraRainUpdate : पुणे शहराला तुफान पावसाने झोडपले , “या ” जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा

पुणे : मराठवाड्याला झोडपल्यानंतर आज पावसाने पुण्यात संध्याकाळपासून विजांच्या कडकडाटसह जोरदार हजेरी लावली आहे. या जोरदार पावसामुळे अनेक भागात भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून महापालिकेच्या वतीने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला असून हेल्पलाईन नंबरही दिला आहे. पुणे शहरातील पडणाऱ्या पावसाचा प्रचंड वेग लक्षात घेता आपल्या पुणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य त्या सूचनाही दिलेल्या आहेत.
पुण्यात कोसळत असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे कि , ‘पुणे आणि लगतच्या भागांवर सध्या १२ ते १५ किमी उंचीचे ढग आहेत. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरणे, फ्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात. पुणे शहरातील पडणाऱ्या पावसाचा प्रचंड वेग लक्षात घेता आपल्या पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज आहेत. मी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. आपण लवकरात लवकर घरी पोहोचा आणि घरी असाल तर बाहेर पडणे टाळा,’ असे आवाहनही मोहोळ यांनी केले आहे.
मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन मदत व सेवा केंद्र
०२०-२५५०६८००/१/२/३/४
०२०-२५५०१२६९
अनेक भागात वीजपुरवठा खंडित
दरम्यान या पावसामुळे काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन जनजीवन विस्कळीत होऊ शकते त्यामुळे पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबा’ असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. तर अनेक दुकानांमध्येही पाणी शिरले आहे. अचानक आलेल्या या मुसळधार पावसाने पुणेकरांचे अतोनात हाल झाले असून काही भागातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याच्या घटनाही घडल्याने अनेक भाग काळोखात बुडाले होते. मेघगर्जनेसह अचानक आलेल्या पावसामुळे रात्री कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांचे चांगलेच हाल झाले.
या जिल्ह्यांतही मुसळधार पावसाचा इशारा
या आधीही गेल्या आठवडाभरापासून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातही पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान हवामान खात्याकडून लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि रायगड या जिल्ह्यांत आगामी काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांतील काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.