Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : अफगाणिस्तानातून लष्कराला परत बोलावले तरी दहशतवादाविरोधातील लढाई सुरु राहील : जो बायडेन

Spread the love

वॉशिंग्टन : अमेरिकन लष्कराला अफगाणिस्तानमधून परत बोलवल्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बुधवारी पहिल्यांदाच देशाला संबोधित करताना अमेरिकेची अफगाणिस्तानमधील ही लढाई यशस्वी ठरल्याचे प्रतिपादन केले आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी दहशतवादाविरोधातील लढाई सुरु राहील इशाराही दिला आहे. “मला विश्वास आहे ही अफगाणिस्तानमधून अमेरिकन लष्कराला माघारी बोलवण्याचा निर्णय हा सर्वात योग्य, विचारपूर्व आणि सर्वोत्तम आहे,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले आहे.

अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तानमधून माघार घेतली असली तरी आम्ही कायमच अफगाणिस्तानमधील जनता आणि त्यांच्या अधिकारांसाठी तसेच मानवाधिकारांसाठी लढत राहणार आहोत. २० वर्ष चाललेली ही लढाई फार आव्हानात्मक होती. हे अमेरिकेसाठी फार महागडं युद्ध ठरलं, असंही बायडेन म्हणाले. बायडेन पुढे म्हणाले कि , आम्ही अफगाणिस्तानबरोबरच जगभरामध्ये दहशतवादाविरोधात लढाई सुरु ठेवणार आहोत. मात्र यापुढे आम्ही कोणत्याही देशामध्ये लष्कर तळ नव्याने उभारणार नाही. अफगाणिस्तानमधील युद्ध आमच्यासाठी संपलं आहे. हे युद्ध कसं संपवावं यासंदर्भात विचार करणारा मी चौथा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होतो. मी अमेरिकेच्या लोकांना हे युद्ध संपवण्याचा शब्द दिलेला आणि मी दिलेल्या शब्दाचं पालन केलं आहे.

मी या निर्णयाची पूर्ण जबाबदारी स्वीकारत आहे. लोकांचं म्हणणं आहे की हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. मात्र मी याच्याशी सहमत नाही कारण आधी हे केलं असतं तर अराजकता निर्माण झाली असती आणि त्या देशामध्ये गृहयुद्ध सुरु झालं असतं. अशावेळेस संकटांचा सामना न करता आणि धोका पत्करुन तेथून निघता आलं नसतं, असंही बायडेन म्हणाले. “अफगाणिस्तानसंदर्भातील हा निर्णय केवळ त्या देशापुरता मर्यादित नव्हता. हा निर्णय म्हणजे लष्करी मोहिमांचं एक युग संपुष्टात आणण्यासारखं आहे,” असं बायडेन यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये जे काम केलं आहे ते विसरता येणार नाही असंही बायडेन म्हणाले.

काबूल सोडण्याशिवाय काही पर्याय शिल्लक नव्हता

दरम्यान बायडेन यांनी, “अमेरिकेचं हित हे अधिक महत्वाचं होतं म्हणूनच आमच्याकडे काबूल सोडण्याशिवाय काही पर्याय शिल्लक नव्हता,” असंही या भाषणादरम्यान म्हटलं आहे. आम्ही अमेरिकेचं हित लक्षात घेत काबूल सोडलं. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर हा दहशतवादासाठी केला जाऊ नये, असंही बायडेन म्हणाले आहेत. जागतिक संबंधांबद्दल बोलताना बायडेन यांनी चीन आणि रशियाचा उल्लेख केला. “आपण चीनकडून दिल्या जाणाऱ्या आव्हानांचा सामना करत आहोत, रशियासुद्धा आपल्याला आव्हान देत आहे. आपल्याला अफगाणिस्तानमध्ये त्यांच्याशी संघर्ष करायचा नव्हता. आपण नवीन मार्गांनी पुढे जाण्याच्या प्रयत्नात आहोत. आपलं परराष्ट्र धोरण हे देशाच्या हितामध्ये हवं,” असंही बायडेन यांनी जागतिक स्तरावर या निर्णयाकडे कसं पाहिलं जाईल याबद्दल बोलताना सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!