AurangabadRainUpdate : कन्नड घाटात दरड कोसळली , धुळे – औरंगाबाद – सोलापूर वाहतूक मार्गात बदल

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड घाटात दरड कोसळली आहे. ही दरड कोसळल्यामुळे धुळे – औरंगाबाद – सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ही दरड कोसळल्यामुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, ढिगाऱ्याखाली अनेक गाड्या अडकल्याचं दिसत आहे. दरड कोसळली त्या ठिकाणी पोलीस पथक दाखल झाले असून दरड हटविण्याचे काम वेगाने सुरू आहे.
जोरदार पावसामुळे कन्नड तालुक्यातील नागद गावातील गडदगड नदीला मोठा पूर आला आहे. नदीच्यालगत आलेल्या बालाजी मंदिराच्या पायरिला पाणी लागलं आहे. बाजूला बालाजी भगवंताचे पुजारी कुटुंब नदिकाठी घर असल्याने त्याच्या घरात पाणी शिरले, त्यांना रात्री ३ वाजता नागरिकांनी गच्चीचे गज तोडून सुखरूप बाहेर काढले.
वाहतूक मार्गात बदल
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ धुळे – सोलापूर रोडवरील (कन्नड) चाळीसगाव घाटातील दरड कोसळल्याने चाळीसगाव घाट बंद झाला असल्याने आम्ही व सोबत तीन अमलदारासह कसाबखेडा फाटा येथे थांबून सदरची वाहतूक शिऊर बंगला नांदगाव मार्गे वळविण्यात आली आहे.तसेच दौलताबाद टी पॉईंट समोर बॅरिकेट लावून जड अवजड वाहतूक बंद करण्यात आली असून सदर ठिकाणी बंदोबस्त नेण्यात आला आहे पाऊस चालू असून वाहतूक सुरळीत चालु आहे शांतता असल्याचे सुरेश भाले, सहा पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र, औरंगाबाद यांनी कळविले आहे.
उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार
तितुर व डोंगरी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासना मार्फत देण्यात आला आहे. चाळीसगांव शहरातील विविध भागात पुराचे पाणी घुसल्याने मोठया प्रमाणात नुकसान झालंय. प्रसिद्ध पीर मुसा कादरी बाबांच्या दर्गात पाणी शिरले आहे.