Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : अखेर काबुल विमानतळावर ‘इसिस’ कडून आत्मघाती हल्ले , १५ जणांचा मृत्यू

Spread the love

काबूल : काबूल विमानतळावर गुरुवारी सायंकाळी करण्यात आलेल्या आत्मघातकी साखळी स्फोटात १३ ते १५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून या स्फोटांची जबाबदारी ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेकडून स्वीकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे मृतांत काही लहान मुलांचाही समावेश असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

या हल्ल्यात अमेरिकेचे ४ सैनिक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सर्व देशांच्या दूतावासानी आपापल्या नागरिकांना काबूल विमानतळावरून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. हा हल्ला घडून आला तेव्हा काबूल विमानतळावर हजारो लोक उपस्थित होते.

यातील पहिला स्फोट हा विमानतळाच्या गेटवर झाला तर दुसरा विमानतळाच्या जवळच असलेल्या एका हॉटेलजवळ झाला. या हॉटेलमध्ये ब्रिटनचे सैनिक सध्या तळ ठोकून आहेत. हे सैनिक अफगाणिस्तानात अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहेत.स्थानिक पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंवरून हा हल्ला किती भयंकर होता याची कल्पना येत आहे. अमेरिकेच्या पेंटॅगॉनने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण अद्याप किती नुकसान झाले याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

कालच याबाबत फ्रांस , ब्रिटन आणि अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने विमानतळाबाहेर इसिसच्या दहशतवाद्यांकडून कधीही हल्ला होऊ शकतो, असे संदेश दिल्यानंतर व्हाईट हाऊसने आपल्या नागरिकांसाठी ऍडव्हायझरी जरी केली होती. तर तालिबाननेही काबूल विमानतळावर इसिसच्या दहशतवाद्यांकडून हल्ल्याचा धोका जाहीर केला होता. दरम्यान तालिबान सैनिकांनी विमानतळाजवळ इसिसच्या चार दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. हे चार दहशतवादी विमानतळाच्या परिसराची रेकी करण्यासाठी इथे दाखल झाले होते.

तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद याने एका दिवसापूर्वी अफगाणिस्तानाच्या जमिनीवरून इस्लामिक स्टेटचा सफाया करण्यात आल्याचा दावा केला होता. तालिबान इसिसला आपल्या देशात हात-पाय पसरण्याची परवानगी देणार नाही, असे तालिबानने म्हटले होते . अशावेळी, शक्तीप्रदर्शन करण्यासाठी इसिसने आजचे साखळी बॉम्बस्फोट घडवून आणल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या आत्मघातकी हल्ल्यात रशियन मीडिया स्पुतनिकने १३ लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. तर, फॉक्स न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार या स्फोटात ४ अमेरिकन सैनिकांचाही मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे. दरम्यान अमेरिकेने काबूल एटीसी सोडल्यानंतर भारतातून आणखी काही विमानाचं उड्डाण करणं अवघड आहे. गुरुवारी शेवटच्या रेस्क्यूनंतर पुढील आदेश येईपर्यंत भारतीय उड्डाणे निलंबित राहतील असे भारताचे परराष्ट्र जयशंकर यांनी म्हटले आहे.

अफगाणिस्तानात तालिबानने वर्चस्व मिळवल्यामुळे इसिसचे दहशतवादी चिडले असून आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून इसिसच्या दहशतवाद्यांनी तालिबानविरुद्ध मोहिमही चालवली होती. इसिसचे समर्थन करणाऱ्या मीडियाने १६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान जवळपास २२ प्रॉपोगंडा निर्माण करणारे लेखही प्रकाशित केले आहेत. इसिसने १९ ऑगस्ट रोजी आपले वक्तव्य जाहीर करताना तालिबानला ‘अमेरिकेच्या हातातील खेळणे संबोधून अफगाणिस्तानात जे काही घडलं त्यात तालिबानचा नाही तर अमेरिकेचा विजय असल्याचेही इस्लामिक स्टेटने म्हटले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!