Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaAndolanUpdate : मराठा आरक्षण : नाशिकमध्ये दुसऱ्या मूक आंदोलनाला सुरुवात, छगन भुजबळ यांच्या खुर्चीवर बसण्यावरून गोंधळ !!

Spread the love

नाशिक : “समन्वयकांना आणि जे राज्यातून आलेले आहेत. जे समाजाचे घटक आहेत, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे. आपण जे आंदोलन पुकारलं आहे, ते मूक आंदोलन आहे. समाज बोलला आहे. आम्ही बोललो आहोत. आता लोकप्रतिनिधींनी आपले मत व्यक्त करावे . ते काय जबाबदारी घेणार, हे सांगावे. समन्वयकांनी आणि इतरांनी उलट प्रश्न करू नये. पक्षाशी संबंधित न बोलता लोकप्रतिनिधींनी समाजाला न्याय देण्यासाठी काय करू शकता, समाजाची कोणती जबाबदारी घेणार, हे सांगावे. कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध नाही. आपली भूमिका सांगावी, आम्ही बोलणार नाही,” अशी भूमिका खा. छत्रपती संभाजीराजे यांनी मांडली.


आज नाशिकमध्ये मूक आंदोलन होत असून, आंदोलन सुरू होण्यापूर्वी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना हे आवाहन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर राज्यात आरक्षणाची मागणी तीव्र झाली आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई सुरू केली असून, राज्यभरात मूक आंदोलने करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. कोल्हापुरात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती स्थळी पहिले मूक आंदोलन झाल्यानंतर आज दुसरे मूक आंदोलन नाशिकमध्ये सुरू झाले आहे. आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

छगन भुजबळ यांच्या खुर्चीवर बसण्यावरून गोंधळ

या आंदोलनादरम्यान नाशिकचे पालकमंत्री, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना बसण्यासाठी खुर्ची देण्यावरून वाद पाहण्यास मिळाला. मराठा आंदोलकांनी भुजबळांना खुर्ची का बसण्यास दिली म्हणत विरोध केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. यावरून मराठा कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला. भुजबळ यांना बसायला खुर्ची का दिली म्हणून मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते, त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी संभाजीराजे स्वत: समोर आले. भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहे. त्यांना खाली बसायला अडचण आहे. त्यांना खुर्चीवर बसू द्या, ते खुर्चीवर बसले तर काहीही अडचण नाही, आपण सगळ्यांनी मन मोठे ठेवा, असे आवाहन संभाजीराजेंनी केले. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. त्यानंतर भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबद्दल आपली भूमिका मांडली आणि आपण खुर्चीवर का बसलो होतो, याचा खुलासाही केला.

‘छगन भुजबळ दुष्मन आहे असा अपप्रचार केला जातोय. आपण एकत्र येऊन लढूया. आपला लढा व्यवस्थेशी आहे, तो कुण्या व्यक्तीविरोधात नाही. त्यामुळे चर्चेशिवाय मार्ग नाही मला पाठीचा त्रास आहे, त्यामुळे खुर्चीवर बसलो, असे भुजबळांनी सांगितले. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळालं पाहिजे यात दुमत नाही. सर्व पक्षांची हीच भूमिका आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मिळायला हवे ही माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका आहे. ओबीसी आक्रोश मोर्चा मराठा आरक्षण विरोधात नाही. दोघांचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारले , असेही भुजबळांनी स्पष्ट केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!