MarathawadaUnlockUpdate : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात काय राहील चालू आणि काय राहील बंद ?

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्यातील अनलॉकबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्यात होणार आहे. म्हणजेच येत्या सोमवारपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे. मराठवाड्याच्या दृष्टीने पहिल्या स्तरात मराठवाड्यातील जालना , लातूर , नांदेड या तीन जिल्ह्यांचा , दुसऱ्या स्तरात औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद, परभणी, तर तिसऱ्या स्तरात बीड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.
कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावर निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी अनलॉक संदर्भात घोषणा केली होती. मात्र, काही तासातच राज्य सरकारने खुलासा करून कोणतीही नियमावली अद्याप निश्चित करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अखेर शुक्रवारी मध्यरात्री नियमावली जारी करण्यात आली आहे. राज्यात अनलॉकसाठी पाच स्तर तयार करण्यात आले आहेत.
पहिल्या स्तरात काय चालू राहील ?
मॉल, दुकाने, थिएटर आणि सभागृहांच्या वेळेचे बंधन नसेल. या भागात सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होतील. रेस्टॉरंटसाठीही परवानगी असेल. लोकल सेवेबाबतचा निर्णय त्याठिकाणचं स्थानिक प्रशासन घेईल. सार्वजनिक मैदानं, वॉकिंग, सायकलिंग याला परवानगी असेल. 100 टक्के क्षमतेनं सरकारी कार्यालये खुली करण्यासही परवानगी असेल. खेळ, शूटींग, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी, लग्न समारंभ, अंत्यसंस्कार, बैठका, निवडणूक यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध राहाणार नाही. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत असेल. या भागात जमावबंदीही नसेल.
दुसऱ्या स्तरात काय चालू राहील ?
दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येथील तिथे सर्व प्रकारची दुकानं पूर्णवेळ सुरु होतील. ठिकाणी मॉल आणि सिनेमा हॉलमध्ये 50 टक्केच उपस्थितीची अट राहील. रेस्टॉरंटसाठीही 50 टक्के क्षमतेस परवानगी. या स्तरात लॉकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असेल.सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा. शासकीय कार्यालयेही 100 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू असतील. या स्तरात विविध खेळांसाठी सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 अशी वेळ राहील. शूटिंगलाही परवानगी असेल. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितीची मर्यादा असेल. लग्न सोहळ्यासाठी हॉलमधील आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त 100 जणांच्या उपस्थितीत परवानगी असेल. अंत्यविधीसाठी कोणतेही बंधन नसेल, बैठका, निवडणूक यावरही कोणतीच बंधने नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना 50 टक्के क्षमतेने परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा 100 टक्के क्षमतेने सुरू होईल. या भागात जमावबंदी लागू असेल.
तिसऱ्या स्तरात काय चालू राहील ?
तिसऱ्या स्तराच्या जिल्ह्यात दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील तर शनिवार, रविवारी ती बंद असतील. सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहतील.