AurangabadNewsUpdate : भाजपचे कार्यकर्ते देताहेत गृह विलगीकरणातील रूग्णांना मानसिक आधार

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसरया लाटेमध्ये प्रशासनाला मदत करण्यासाठी राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थादेखील सक्रिय आहेत. कोणी कोविड सेंटर उभे केले आहे, कुणी भोजनाची व्यवस्था करीत आहेत, तर कोणी प्लाझमा व रक्तदानासाठी प्रयत्न करीत आहेत. एकीकडे या गरजा आवश्यक असताना दुसरीकडे रूग्णांना, विशेषतः गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना मानसिक व भावनिक आधार देणेही गरजेचे असल्याचे जाणवले आहे. ही गरज ओळखून औरंगाबादमधील भाजपचे कार्यकर्ते गृह विलगीकरणातील रूग्णांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत आहेत. त्यांच्या अडचणी समजून घेत आहेत आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही आवश्यक गरजा असतील तर महापालिकेच्या संबंधित अधिका-यांकडे त्याची माहिती देत असल्याची माहिती भाजपच्या राष्ट्रीय सचिव व औरंगाबादच्या माजी महापौर विजया रहाटकर यांनी दिली आहे.
विजया रहाटकर यांच्याच पुढाकारातून हे प्रयत्न चालू आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे देशभर ‘सेवेसाठी संघटन’ हे अभियान चालविले जात आहे. याच अभियानातंर्गंत भाजपचे कार्यकर्ते गृह विलगीकरणातील सुमारे पाचशे रूग्णांच्या दैनंदिन संपर्कात आहेत. यासाठी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांचे सहकार्य असून रूग्णांकडून मिळत असलेला फीडबॅक दररोज महापालिकेच्या संबंधित अधिका-याना दिला जात आहे, जेणेकरून रूग्णांना वेळेत मदत पोहोचविणे शक्य होत आहे.
“एकूण रूग्ण संख्येच्या सुमारे ८० ते ८५ टक्के रूग्ण हे गृह विलगीकरणामध्ये (होम आयसोलेशन) असतात. एका अर्थाने त्यांचा आरोग्य यंत्रणांवर थेट भार नसला तरीही गृह विलगीकरणात असलेल्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यापैकी सर्वाधिक महत्वाचा भाग म्हणजे मानसिक व भावनिक आधार. दुर्देवाने याकडे फार लक्ष दिले जात नाही किंवा सद्यस्थितीत ते देता येणे, आरोग्य यंत्रणांना शक्य नाही. म्हणून आम्ही मानसिक व भावनिक धीर (सायकोलाॅजिकल कौन्सिलिंग) देण्यासाठी एखाद्या हेल्पलाइनसारखे काम करीत आहोत,” असे विजया रहाटकर यांनी सांगितले.