AurangabadNewsUpdate : “त्या ” सलून चालकाच्या मृत्यूला पोलीस जबाबदार नाहीत, पोलिसांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई

औरंगाबाद : उस्मानपुरा येथील एसएस पार्लरचे मालक फेरोज कदिर खान (५१, उस्मानपुरा) यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला नसून ते स्वत:च चक्कर येऊन पडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ . या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला आहे़ दरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचा कांगावा करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त दिपक गिऱ्हे यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
नेमके काय झाले ?
उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीरबाजारमधील एसएस पार्लर हे दुकान लॉकडाऊन कालावाधीत सुरू असल्याने ते बंद करण्यासाठी पोलीस बुधवारी पार्लरवर गेले होते़ या वेळी पार्लर मालक फेरोज खान दुकानाबाहेर येऊन पोलिसांशी चर्चा करत असतांना त्यांना अचानक चक्कर आल्याने ते जागीच कोसळले़ बंद दुकानाच्या कुलूपवर त्यांचे डोके आदळल्याने ते बेशुध्द पडले होते़ त्यानंतर फेरोज यांना तातडीने परिसरातील नागरिकांनी एका वाहनात टाकून रुग्णालयात दाखल केले होते़ तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला़.
मात्र, काही समाजकंटकानी पोलिसांच्या मारहाणीत फेरोज यांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरविल्याने मृतदेह घेऊन हजारो लोकांचा जमाव पोलीस ठाण्याच्या आवारात जमला होता़. या वेळी काही लोक पोलिसांच्या मारहाणीतच फेरोज यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत होते़ त्यामुळे पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलीस निरीक्षक दिलीप तारे, उपनिरीक्षक प्रविण वाघ आणि अंमलदार संदिप धर्मे यांची ठाण्यातून तात्काळ बदली केल्याची घोषणा केली होती़ तेव्हा जमावाने मृतदेह ताब्यात घेतला होता़.
वैद्यकीय अहवालाचा आधार
दरम्यान झोन दोनचे पोलीस उपायुक्त दिपक गिऱ्हे यांनी गुरूवारी सदर प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे की, फेरोज यांचा मृत्यू हा पोलीस मारहाणीत झाला नसून वैद्यकीय अहवालात देखील त्यांचा मृत्यू हा हृदयविकाराची नस बंद पडल्याने ते खाली कोसळले आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे़
पोलिसांवरची कारवाई मागे घेणार
पत्रकारांशी बोलतांना उपायुक्त दिपक गिऱ्हे यांनी सांगितले की, उस्मानपुरा येथील पोलीस निरीक्षक दिलीप तारे, उपनिरीक्षक प्रविण वाघ आणि अंमलदार संदिप धर्मे या तिघांवर आयुक्तांनी केलेली कारवाई ही मागे घेतली जाणार आहे़.