जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदारांचे सामुहिक रजा आंदोलन उमरखेड येथील घटनेचा केला निषेध

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करा अशी मागणी करीत महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि.२) एकदिवसीय सामुहिक रजा आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिले.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील नायब तहसीलदार वैभव पवार यांनी अवैध धंदे करणाऱ्याविरूध्द कारवाईची मोहिम हाती घेतली होती. त्या कारवाईचा राग मनात धरून वैभव पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. नायब तहसीलदारावर झालेल्या या हल्याच्या घटनेमुळे महसूल विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैभव पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना अटक, महसूल कर्मचाऱ्यांना अवैध धंदे करणाऱ्यांकडून संरक्षण द्या आदी विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी चव्हाण यांना देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनावर महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना औरंगाबाद शाखेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गिरगे, सचिव सिध्दार्थ धनजकर, कार्याध्यक्ष संजय वारकड, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी डी.एन.भारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, तहसीलदार राहुल गायकवाड, एल.एन.लाड, नायब तहसीलदार सारिका कदम, योगीता खटावकर, वैशाली डोंगरजाळ, संतोष अनर्थे, शिवम राजपूत, सुरेंद्र देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.