विद्यापीठ नामविस्तार दिनी घरातूनच अभिवादन करा पोलिस प्रशासनाचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त विविध पक्ष, संघटना, कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष विद्यापीठ गेट येथे भेट न देता घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त मिना मकवाना यांनी पत्रकाद्वारे केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त दरवर्षी विद्यापीठ गेट परिसरात अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यानिमित्त वाहनफेरी, जाहीर सभा, अन्नदान, चर्चासत्र आयोजीत केले जातात. त्यासाठी मराठवाड्यासह राज्यातून नागरिक, कार्यकर्ते येतात. मात्र, यंदा कोरोनाचे संकट असल्याने यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, आषाढी व कार्तिकवारी, गणेश उत्सव, ईद यासह विविध कार्यक्रम, सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. सध्याची परिस्थिती लक्षात घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनी (१४ जानेवारी) देखील विविध पक्ष, संघटना, कार्यकर्त्यांनी घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या रॅली, जाहीर सभा, धार्मिक तसेच राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही उपायुक्तांनी दिला आहे.