बहुलखेड्याचा कृषी सहायक लाचेच्या सापळ्यात

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत दोन प्रकरणांची पाहणी करुन त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केल्याचे बक्षीस म्हणून वीस हजाराची लाच स्विकारलेल्या सोयगावच्या बहुलखेड्यातील कृषी सहायकाला गुरुवारी एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई दुपारी सोयगाव तहसील कार्यालयासमोर करण्यात आली. प्रविण माधव सावकारे (३६) असे लाच स्विकारलेल्या कृषी सहायकाचे नाव आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत तक्रारदार शेतक-याची दोन प्रकरणे कृषी सहायक प्रविण सावकारे याच्या अख्त्यारीत होती. या दोन्ही प्रकरणांचा अहवाल वरिष्ठांना सादर केला. त्याचे बक्षीस म्हणून तक्रारदाराकडे सावकारेने ५० हजाराच्या लाचेची मागणी केली. मात्र, तडजोडीअंती वीस हजार रुपये तक्रारदार शेतक-याने देण्याचे ठरले. पण शेतक-याने याविरुध्द एसीबीकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर आज दुपारी एसीबीचे निरीक्षक विकास घनवट, जमादार गणेश पंडूरे, प्रकाश घुगरे, संतोष जोशी आणि मिलिंद इप्पर यांनी सापळा रचून सावकारेला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुध्द सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.