MarathwadaCrimeUpdate : एकतर्फी प्रेमातून १७ वर्षीय मुलीवर तरुणाने केले तलवारीने वार

बीड जिल्ह्यातील रामनगर येथे एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलवारीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पीडित मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर बीडमधीलच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ३० डिसेंबर रोजी आरोपीने हा हल्ला केला होता. परंतु आज गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी २७ वर्षीय आरोपी पोपट बोबडेला अटक केली आहे.
याविषयीची अधिक माहिती अशी कि , साधारणतः एक वर्षापूर्वी १७ वर्षीय पीडित मुलीची आरोपी पोपट बोबडेसोबत ओळख झाली होती. याकाळात आरोपीला पीडित मुलीवर प्रेम झालं. पण पीडित मुलगी त्याच्याशी बोलत नसे. या रागातून आरोपीनं पीडित मूलीवर तलवारीने हल्ला केला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान आई आजारी असल्यानं पीडित मुलगी आठ दिवसांपूर्वी आपल्या गावी आली होती. 30 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता तिच्यावर हा दुर्दैवी हल्ला झाला. त्यावेळी तिचे आई-वडील किराणा आणण्यासाठी बाहेर गेले होते. घरात फक्त वृद्ध आजोबा आणि ती होती. पीडित मुलगी तोंड धुण्यासाठी घराबाहेर आली असता आरोपी पोपट बोबडे यानं अचानक तिच्यावर पाठीमागून येऊन हल्ला केला. त्याच्या हातात धारदार तलवार होती. त्यानं तिच्यावर केलेला वार पीडित मुलीने आपल्या हातावर झेलला. त्यानंतर ती खाली कोसळली. ‘माझ्यासोबत का बोलत नाहीस’ असा जाब विचारत आरोपी बोबडेनी तिच्यावर पुन्हा दोन वेळा वार केला.
या घटनेनंतर आरोपी तेथून फरार झाला. ही घटना पाहिल्यानंतर लोकांनी पीडितेला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. या हल्ल्यात तिच्या पायाला दोन फ्रॅक्चर आले आहेत. संबंधित आरोपीविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.