MarathawadaNewsUpdate : बलात्काराच्या आरोपावरून जन्मठेप झाल्याच्या रागातून पीडितेच्या विरोधात तीन गावे झाली एकत्र !!

बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील बलात्कार पीडित महिलेवर व्यभिचारी असल्याचा आरोप करत पाचेगाव, जयराम तांडा आणि वसंतनगर तांडा या तीन गावांनी तिच्यासह कुटुंबाला हद्दपार करण्याचा ठराव घेतला आहे. एवढ्यावरच न थांबता गावकऱ्यांनी या महिलेविरोधात बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातसमोर धरणे आंदोलनही केले . विशेष म्हणजे २०१५ मध्ये गावातील चार नराधमांनी संबंधित महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कारानंतर न्यायालयाने या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली .
या प्रकारणानंतर या गावातील ग्रामस्थांनी पीडित महिलेला त्रास देणे सुरु केले आहे . दरम्यान तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला . आणि आता तर ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या महिलेचा वागणुकीवर संशय घेत गावातून हाकालण्याचा आणि तडीपार करण्याचा ठराव घेतला तोही १५ ऑगस्टला !! विशेष म्हणजे ग्रामस्थांचा इतका विरोध असूनही न्यायालयीन लढा देत आपल्या तक्रारीवर ठाम राहून महिलेने चारही दोषींना जन्मठेपेपर्यंत पोहोचवलं. पण हीच गोष्ट गावकऱ्यांच्या जिव्हारी लागली. आश्चर्य म्हणजे म्हणजे ज्या ग्रामपंचायतींनी गावबंदीचा ठराव मंजूर केला त्या तिन्ही गावांच्या सरपंच या महिलाच आहेत.
ही महिला सध्या पाचेगावमध्येच राहते. बलात्कार प्रकरणातील चारपैकी दोन आरोपी जयराम तांडा आणि वसंतनगर तांडा इथे होते. त्यामुळे पाचेगावसह इतर दोन गावात सुद्धा या महिलेला राहायला जागा मिळू नये यासाठी तिन्ही गावांनी हद्दपारीचा ठराव मंजूर केला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. पण ज्या ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर केला, त्याची आता जिल्हा परिषदेकडून तपासणी होणार आहे. दरम्यान पाण्याच्या कारणावरुन महिलेने मागील आठवड्यात गावातील ग्रामपंचायत सदस्याविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. यावरुन कर्मचाऱ्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तर महिलेविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून तिला अटक करण्याची मागणी गावकरी करत आहेत.