Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaReservationUpdate : मराठा आरक्षणावरून मराठा नेत्यांमध्ये वैचारिक गोंधळ

Spread the love

राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असताना राज्य शासनाने EWS चा जीआर काढल्यानंतर मराठा नेत्यांमध्ये खळबळ उडाली असून मोठा वैचारिक गोंधळ निर्माण झाला आहे . समाजातील काही नेते राज्य सरकारचे साठां करीत आहेत तर काही नेत्यांनी सरकारच्या विरोधात वक्तव्य करताना , महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खून केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केला आहे. समाजातील काही नेते मराठा समाजाला ओबीसी संवर्गातच आरक्षण द्या असे म्हणत आहेत . काही नेते इडब्ल्यूएस मध्येच आरक्षण द्या म्हणत आहेत तर काहीनेते मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या या मागणीवर ठाम आहेत .

आज वेगवेगळ्या ठिकाणी मराठा नेत्यांनी  वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. पुण्यातील एका पत्रकार परिषदेत विकास पासलकर, श्रीमंत कोकाटे, राहुल पोकळे, राजेंद्र कुंजीर यांनी मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याची मागणी यावेळी केली. यावेळी बोलताना , महाविकास आघाडीने वैध मराठा आरक्षणाचा खून केला आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे नेते श्रीमंत कोकाटे यांनी केला आहे. दरम्यान  राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेला येणार असल्याचं आधी सांगितलं होतं. पण ऐनवेळी ते आले नाहीत.

महाविकास आघाडीकडून मराठा समाजाची फसवणूक

या वेळी बोलताना श्रीमंत कोकाटे म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ज्या ईडब्लूएस आरक्षणाची मागणी केलेलीच नव्हती ते आरक्षण देऊन महाविकास आघाडीने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. पाठीत खंजीर खुपसला आहे. ईडब्लूएसमध्ये बहुतांश मराठा समाज येत नाही.” तसेच यावेळी त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला. “मुख्यमंत्री तसेच मदत व पुनर्वसन मंत्री हे सर्व समाजाचे असतात. मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये होऊ देणार नाही, असं विजय वडेट्टीवार नेहमी बोलतात. पण वडेट्टीवार हे न्यायालय आहेत का? वडेट्टीवार हे मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावत आहेत.”

दरम्यान अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. EWS आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. EWS मुळे आरक्षण न मिळाल्यास अशोक चव्हाण जबाबदार असतील. मराठा उपसमितीचा चव्हाण यांनी तातडीने राजीनामा द्यावा. वडेट्टीवार आणि भुजबळ यांनी समतेची शपथविसरली, एकाच जातीसाठी त्यांचा लढा आहे. राज्यपालांकडे वडेट्टीवार आणि भुजबळ यांची तक्रार करणार असून राजीनामा न दिल्यास तीव्र त्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे मराठा आंदोलक दिलीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. तर सुप्रीम कोर्टात असलेली स्थगिती उठवण्यासाठी सरकारकडे काययोजना आहे? असा सवाल श्रीमंत कोकाटे यांनी सरकारला  केला आहे.

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा आरोप

‘मराठा आणि कुणबी एकच असून मराठा समाजावर अत्यंत चुकीचे आणि बालिशपणाचे आरोप केले जात आहेत. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जागी ओबीसी समाजाचा नेता बनण्यासाठी चढाओढ लागल्यामुळेच मराठा-ओबीसी वाद पेटविण्याचं काम केलं जात आहे. मंत्रिमंडळात राहून महाराष्ट्र पेटविणे राज्याला परवडणार का?’ असा खोचक सवाल उपस्थित करत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांचं नाव न घेता हल्लाबोल केला आहे. विशेष म्हणजे  मेटे यांनी एकीकडे राज्य सरकारवर ताशेरे ओढले तर दुसरीकडे EWS चं समर्थनही केलं आहे.

विनायक मेटे म्हणाले की, मराठ्यांच्या SEBC आरक्षणावर स्थिगिती असून येत्या 24 तारखेपासून न्यायालयात त्यावर सुनावणी होणार आहे. ही सुनावणी किती दिवस चालेल, काय चालेल काही माहीत नाही. तोपर्यंत राज्य सरकारने मोठी नोकरभरतीची घाई लावली आहे. या नोकरभरतीत खुल्या प्रवर्गासाठी 10 टक्के आरक्षण असून मराठा समाजाच्या मुलांना पण त्याचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून ESW चा आमचा आग्रह होता. मात्र त्याबाबत सरकार लवकर निर्णय घेत नव्हतं. शेवटी उच्च न्यायालयाने कानफटात लावल्यानंतर सरकारने निर्णय घेतला आहे,’ असा हल्लाबोल मेटे यांनी केला आहे.

‘अनेकांनी शंका उपस्थित केली आहे की EWS मुळे SEBC आरक्षणाच्या सुनावणीवर काही परिणाम होणार का? परंतु असं अजिबात नाही. मराठ्यांना SEBC आरक्षण मिळाल्यास ऑटोमॅटिक EWS रद्द होईल. पण सरकारने पारदर्शकपणे या शंकांचे निरासरण केलं पाहिजे,’ असा सल्ला देत शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले मात्र EWS आरक्षणाच्या निर्णयाचं समर्थनही केलं आहे.

मराठा आरक्षणावरून समाजातील नेत्यांमध्ये मोठा वैचारिक गोंधळ निर्माण झाला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयावर खा. संभाजीराजे छत्रपती यांनी विरोधात भूमिका घेतली आहे . संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करून जे मिळते आहे ते घ्या आणि विषय संपवा असे आवाहन समाजाला केले आहे . तर आज शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी एका बाजूला एडब्ल्यूएसच्या निर्णयाचे समर्थन केले आहे तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसवर टीका केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!