Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaCoronaEffect : लंडनहून देशात आलेले २१ प्रवासी आढळले कोरोना पॉझिटिव्ह

Spread the love

आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आरोग्यविषयक तपासणी केल्यानंतरच विमान प्रवासाची परवानगी द्यावी असे स्पष्ट असतानाही लंडनहून एअर इंडियाच्या विमानातून भारतातील वेगवेगळ्या शहरांत पोहचलेले एकूण २१ प्रवासी करोना बाधित आढळले असल्याचे वृत्त आहे. हे प्रवासी दिल्ली, चेन्नई, अमृतसर, कोलकाता, अहमदाबाद अशा वेगवेगळ्या विमानतळांवर दाखल झालेले आहेत. त्यामुळे संबंधित राज्यांत आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला सुरुवात करण्यात आली. हे प्रवासी करोना संक्रमित आढळले असले तरी हा ब्रिटनमध्ये आढळून आलेलं करोनाचं नवं स्वरुप आहे का? हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. संक्रमित व्यक्तीचे नमुने चाचणीसाठी पुण्याच्या ‘नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ वायरोलॉजी’कडे पाठवण्यात आलेत.

याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार  लंडनहून दिल्लीला दाखल झालेल्या विमानातील एकूण पाच प्रवासी करोना संक्रमित आढळले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान सोमवारी रात्री ११.३० वाजता दिल्ली विमानतळावर दाखल झालं होतं. यातील पाच जण दिल्ली विमानतळावर झालेल्या चाचणीत करोना संक्रमित आढळले. तर दिल्लीतून पुढे चेन्नईला रवाना झालेल्या एका प्रवाशाची चेन्नई विमानतळावर चाचणी झाल्यानंतर तोदेखील करोना संक्रमित असल्याचं समोर आलं.

कोलकाता आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२२ प्रवाशांना घेऊन एक विमान ब्रिटनहून रविवारी रात्री नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालं होतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ प्रवाशांकडे कोविड रिपोर्ट नसल्यानं त्यांची चाचणी केल्यानंतर इथे दोन प्रवासी करोना संक्रमित असल्याचं लक्षात आलं. एअर इंडियाच्या ब्रिटनहून अमृतसरला दाखल झालेल्यांपैंकी सात प्रवासी आणि चालक दलाचा एक सदस्य करोना संक्रमित असल्याचं आढळलंय. संक्रमितांमध्ये सहा पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. संबंधित विमान २५० प्रवासी आणि २२ केबिन क्रू मेम्बर्ससोबत अमृतसरच्या श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री १२.३० वाजता दाखल झालं होतं.

अहमदाबादला एअर इंडियाच्या लंडनहून दाखल झालेल्या एका ब्रिटिश नागरिकासहीत चार प्रवासी मंगळवारी सकळी कोरोना संक्रमित आढळले. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता हे विमान अहमदाबादला दाखल झालं होतं. सायंकाळपर्यंत २७५ प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. यात एका ब्रिटिश नागरिकासह चार जण करोना संक्रमित असल्याचं आढळून आलं. कोरोनाचं नवं स्वरुप उघड झाल्यानंतर भारतानं २३ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत ब्रिटनला येणाऱ्या – जाणाऱ्या सगळ्या विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. तसंच केंद्र सरकारकडून नवी नियमावलीही (Mutant Coronavirus Strain SOPs) जाहीर करण्यात आलीय. नव्या नियमानुसार, ब्रिटनहून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावरच आरटी-पीसीआर चाचणी करणं अनिवार्य आहे. या टेस्टमध्ये करोना संक्रमित आढळलेल्या रुग्णांना एका वेगळ्या आयसोलेशन युनिटमध्ये इन्स्टिट्युशन क्वारंटीनमध्ये ठेवण्यात येईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!