AurangabadNewsUpdate : रिक्षात विसरलेल्या दोघींच्या बॅगा पोलिसांनी परत मिळवून दिल्या , पोलिसांची तत्परता

औरंंंगाबाद : रिक्षाने प्रवास करीत असतांना रिक्षात विसरलेल्या दोन महिला प्रवाशांच्या बॅगा पुंडलिकनगर आणि सिटीचौक पोलिसांनी तत्परता दाखवत परत मिळवून दिल्या. पोलिसांनी तत्परता दाखवत महिला प्रवाशांच्या बॅगा आणि किंमतीचा ऐवज परत मिळवून दिल्याने महिला प्रवाशांनी पोलिसांचे आभार मानले आहे.
नंदा अरविंद कदम (रा.गजानन कॉलनी, गारखेडा परिसर) या मुलासह देगलूर येथून एसटी महामंडळाच्या बसने सिडको बसस्थानक येथे आल्या. तेथून नंदा कदम या रिक्षाने सिडको बसस्थानक ते रिलायंन्स मॉल प्रवास करून गजानन कॉलनी येथील घरी परतल्या. घरी आल्यावर रिक्षात त्यांची पर्स विसरली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पर्समध्ये सोने-चांदीचे दागीने, रोख रक्कम, साड्या असा एकूण ३६ हजार रूपये किमतीचा ऐवज होता. नंदा कदम यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रविण मुळे, दिपक जाधव शिवाजी गायकवाड, एसपीओ श्रीमंत गोर्डे पाटील, विजय गांगे व चेतन हिवराळे आदींनी नंदा कदम यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार रिक्षामालक शेख जुनेद यांचा शोध घेऊन त्याला दोन तासात पोलिस ठाण्यात आणले. शेख जुनेद यांनी रिक्षात विसरलेली बॅग परत केल्यावर पोलिसांनी ती बॅग नंदा कदम यांच्याकडे सुपुर्द केली.
दुस-या घटनेत, सिटीचौक परिसरातील रोहिलागल्ली येथे राहणा-या नगमा खान साबेर खान या बाहेरगावाहुन बुधवारी सायंकाळी रिक्षाने रोहिलागल्ली येथे परत आल्या. रिक्षातून सामान काढत असतांना त्यांची एक बॅग रिक्षातच विसरून राहिली होती. हा प्रकार लक्षात आल्यावर नगमा खान यांनी नातेवाईकासह सिटीचौक पोलिस ठाणे गाठुन तक्रार दिली. सिटीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी तत्परता दाखवत रोहिला गल्ली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले. त्यावेळी नगमा खान या रिक्षा क्रमांक (एमएच-२०-बीटी-८९४६) मधुन आल्या असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून रिक्षाचालकाला ताब्यात घेवून बॅग विषयी चौकशी केली असता, त्याने नगमा खान यांची बॅग पोलिसांना सुपुर्द केली. बॅगमध्ये लग्नातील दागीने, मोबाईल, कपडे असा जवळपास २ लाख रूपये किमतीचा ऐवज होता.