AurangabadCrimeUpdate : पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे पतीची आत्महत्या , आरोपी प्रियकर पोलीस कोठडीत

औरंगाबाद शहरात पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे समाजात बदनामी झाल्याचा अपमान सहन न झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी तपास करून आरोपी प्रियकर गणेश लक्ष्मण गोरे (२६, रा. अशोकनगर, मसनतपुर, चिकलठाणा) याला बुधवारी सायंकाळी अटक केली. आरोपीला सात नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जी. दुबे यांनी गुरुवारी दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , या प्रकरणात मृताच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्यांचा मुलगा पत्नीसोबत राहत होता. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या सुमारास त्याने पत्नीला तिचा प्रियकर तथा आरोपी गणेश गोरे याच्यासोबत घरात गप्पा मारताना पाहिले होते. त्यामुळे त्यांनी गणेश गोरे इथे काय करतो असे विचारले. त्यावरून दोघांनी त्याला शिवीगाळ व मारहाण केली. याचा राग आल्याने तो वडील राहत असलेल्या घरी आला आणि तेथे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता गुन्हा गंभीर असून आरोपीकडे अनैतिक संबंधाबात चौकशी करणे आहे. आरोपींना गुन्ह्यात कोणी मदत केली का तसेच आरोपी प्रेयसी तथा मृताची पत्नी कोठे आहे याचा देखील तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील योगेश सरोदे यांनी न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आदेश दिले.