Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : चर्चेतली बातमी : “पूछता भारत ” फेम अर्णबला आता ” पूछते पोलीस ” , थेट गृमंत्र्यांनीही केला अटकेचा निषेध , भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन …

Spread the love

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘हा लोकशाहीच्या चौथ्या खांबावर हल्ला असून यामुळे पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण झाली आहे’ अशी संतप्त प्रतिक्रिया शहांनी दिली. दरम्यान अमित शहा यांची प्रतिक्रिया येताच भाजपने या अटकेच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच नेत्यांनी या विषयात संताप व्यक्त करीत महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे.


अमित शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , काँग्रेस आणि त्यांच्यासोबत असलेल्या पक्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणणारे कृत्य केले आहे. राज्य सरकारने आपल्या सत्तेचा गैरवापर करुन अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई केली आहे. तसंच, ‘सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पत्रकारिता आणि एका व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर हा हल्ला आहे. पत्रकारितेवर झालेल्या या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण झाली आहे’, असंही  शहा म्हणाले. त्याचबरोबर, पत्रकारितेवर झालेल्या या हल्ल्याचा अमित शहा यांनी निषेध व्यक्त केला आहे.

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी अलिबागजवळील कावीर इथं आपल्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या आई कुमुद नाईक यांचाही घरात मृतदेह आढळून आला होता.  या प्रकरणी गोस्वामी यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आज सकाळी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली.

काय आहे प्रकरण?

अन्वय नाईक यांची मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाची कंपनी होती. ५ मे २०१८ रोजी  अन्वय नाईक यांनी अलिबाग जवळील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यांच्या खिश्यात एक सुसाईट नोट आढळून आली होती. त्यात अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा यांनी आपले पैसे थकविल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं नमूद केले होते. त्यामुळे तिघांविरोधात आत्महत्येत प्रवृत्त केल्या प्रकरणी अलिबाग पोलिसांत भादंवि ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अर्णब  व अन्य दोघांनी नाईक यांचे पैसे थकवल्याने ते निराश झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे याचवेळी नाईक यांच्या ७३ वर्षांच्या आई कुमुद यांचाही मृतदेह घरात सापडला होता.

या आत्महत्या प्रकरणात कुठलीही कारवाई न झाल्याने अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी गृहमंत्र्यांना भेटून न्याय देण्याची विनंती केली होती. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात कुठलीही सुसाईड नोट नसताना सीबीआय चौकशी होते आणि माझ्या वडिलांनी सुसाईड नोट मध्ये तिघांची नावे लिहूनही कारवाई का होत नाही ? अशी विचारणा केली होती . त्यानंतर आज सकाळी अलिबाग पोलिसांनी हि कारवाई केली . या कारवाई नंतर नाईक कुटुंबीयांनी पोलिसांचे आणि राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

नाईक कुटुंबीयांनी मानले पोलिसांचे आभार

“अर्णब गोस्वामी यांची अटक योग्य आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांच्यासह नावं लिहिली आहेत. त्यांच्यामुळेच माझ्या वडिलांनी आणि आजीने आत्महत्या केली. आजच्या दिवसासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो. महाराष्ट्र पोलिसांनी यापुढे निपक्ष तपास करावा. आम्हाला राजकारण करायचं नाही, फक्त न्याय हवा आहे,” अशी प्रतिक्रिया अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी दिली. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता आणि आज्ञा नाईक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

माझ्या वडिलांनी आणि आजीने 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी,आयकास्ट  स्लॉशस्काय मिडियाचे फिरोज शेख, मगरपट्टा येथील ‘स्मार्ट वर्क्स ’चे नितेश सारडा यांची नावे लिहून त्यांच्याकडे असलेली थकबाकीची रक्कम लिहिली होती. त्यांच्याकडील थकीत रक्कम त्यांनी दिली असती तर ते आज जिवंत असते, असं त्यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी सांगितलं. तर मुलगी आज्ञा नाईक यांच्या माहितीनुसार, “अर्णब गोस्वामी सातत्याने माझ्या वडिलांना धमकी देत होते, तुला पैसे कसे मिळतात तेच पाहतो. तुझ्या मुलीचं करिअर उद्ध्वस्त करतो, अशी धमकी दिली होती.” संपूर्ण काम 6 कोटी 40 लाख रुपयाचं होतं. 83 लाख रुपयांचं देणं होतं. परंतु ते पैसेही त्यांनी दिले नाही, असा दावा अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मेल केला परंतु तपास झाला नाही , 2018 पासून  कारवाई होत नव्हती

या संदर्भात तत्कालीन पोलीस आयुक्त संजय बर्वे, रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, तपास अधिकारी सुरेश वऱ्हाडे यांना भेटलो होत. सुरेश वऱ्हाडे यांनी मार्च 2020 पर्यंत त्यांनी आम्हाला अंधारात ठेवलं. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच पीएमओला ई-मेल केला. परंतु काहीच उपयोग झाला नाही, असा दावा कुटुंबीयांनी केला. अर्णव गोस्वामी यांचा जबाब अलिबाग पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आल्याचं खोटं सांगण्यात येत आहे. पण गोस्वामी यांचा जबाब पोलीस उपमहासंचालकांच्या कार्यालयात नोंदवण्यात आला. अर्णव गोस्वामीला व्हिआयपी ट्रिटमेंट का? आम्ही पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठवली होती, असंही अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी सांगितलं आहे. तसंच, त्यांनी तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

मुळचे कावीर येथे राहणारे अन्‍वय नाईक  हे मुंबईत व्‍यवसायानिमित्‍त राहत होते. अन्वय हे मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाने अंतर्गत वास्तूरचना आणि सजावटीचा व्यवसाय करायचे.  नाईक यांच्या पत्नीनेही दिलेल्या तक्रारीवरून या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तत्कालीन पोलीस अधीक्षक अनिल परस्कार यांनी दिली होती.

पोलिसांनी मला मारहाण केली : अर्णब गोस्वामी

दरम्यान, एएनआय वृत्तसंस्थेनं एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये अर्णब  गोस्वामी यांनी मुंबई पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. याबद्दलचे रिपब्लिक वृत्तवाहिनीचे काही फोटो शेअर केले आहे. गोस्वामी यांच्यावर आज रायगड पोलिसांनी राहत्या घरातून अटकेची कारवाई केली आहे. यावेळी अर्णब यांनी कारवाईदरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे.  आजच्या  कारवाईत दोन पोलिसांकडून मारहाण झाली शिवाय कुटुंबातील सदस्यांनाही मारहाण केली, असा आरोप अर्णब यांनी केला आहे. अर्णब यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती तिथे बांधलेली पट्टी देखील पोलिसांकढून काढण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या हाताला व पाठीत देखील मारलं आहे, अशी माहिती अर्णब गोस्वामी यांचे वकिल गौरव पारकर यांनी दिली आहे. तसंच, अर्णब यांच्या अटकेबद्दलची माहिती पत्नीला देखील दिली गेली नव्हती, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी घरात प्रवेश केल्यापासून सर्व घटनांचे चित्रीकरण केले आहे. अटकेची कारवाई करतेवेळी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत, न्यायालयाने जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अहवाल मागितला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!