MaharashtraCrimeNewsUpdate : आधी ओळख , मग मैत्री , मग प्रेम , मग बाळ , जबादारी नाकारणाऱ्या पोलिसांवर बलात्काराचा गुन्हा

महिलांवरील अत्याचाराचे कायदे कितीही कडक केले किंवा या विषयावर देशात गांभीर्याने कितीही चर्चा होत असली तरी महिलांच्या लैंगिक शोषणाचे गुन्हे कमी होताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे ज्यांच्यावर महिलांच्या रक्षणाची कायदेशीर जबाबदारी आहे त्या पोलीस खात्यातील एका पोलीस कॉन्स्टेबलने घाटकोपर येथील ४० वर्षीय इंटेरिअर डिझायनर महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुरुवारी संशयित आरोपी पोलिसावर गुन्हा नोंदवला आहे. पीडित महिलेने या प्रकरणी पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली आहे. लग्नाच्या भूलथापा देऊन अनेकदा माझ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या तक्रारीनंतर संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. वर्षभरापूर्वी पीडित महिलेने बाळाला जन्म दिला. मात्र, माझं लग्न आधीच झालेलं आहे. त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. जर लग्न केले तर मला नोकरी गमवावी लागेल, असे कॉन्स्टेबलने तिला सांगितले. पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तुझ्याशी लग्न करीन असे त्याने सांगितले. मात्र, त्याने तसे केले नाही, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. १९९८ मध्ये कॉन्स्टेबलसोबत ओळख झाली होती. अंधेरीतील खासगी कंपनीत त्यावेळी ती नोकरी करत होती. काही दिवसांनंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यावेळी त्याने लग्नाच्या भूलथापा दिल्या. आरोपीने माझ्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. जवळपास ८७ लाख रुपये माझ्याकडून उकळले, असाही आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.