AurangabadNewsUpdate : रिक्षाचालकांनी वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई

सहाय्यक आयुक्त डॉ. दिनेश कोल्हे यांचा इशारा
औरंगाबाद : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ऑटोरिक्षातून जास्तीचे प्रवासी बसवून वाहतूक करतांना मिळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. दिनेश कोल्हे यांनी दिला आहे. शहरातील विविध रिक्षा चालक संघटनांच्या पदाधिका-यांची बैठक वाहतूक शाखेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करतांना सहाय्यक आयुक्त कोल्हे बोलत होते.
शासनाने रिक्षातून चालकासह दोन प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. कोरोनाचा संसर्ग असेपर्यंत हे नियम पाळावेच लागतील. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना शासनाकडून केल्या जात आहे. शहरात जमावबंदी आदेश लागू आहे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये. रिक्षाचालकांनी स्वतः ची व प्रवाशांची काळजी घेत प्रवास सुरक्षित करण्यासाठी फेस मास्कचा उपयोग व सँनिटायजर व सोशल डिस्टनसचे पालन होने गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच कोरोना संकटकाळात वाहतूक शाखेला नियमांचे पालन करत सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, लाल बावटा ऑटो युनियनचे बुध्दीनाथ बराळ यांनी ऑटोचालक मालकांच्या आर्थिक अडचणी व विविध समस्या बैठकीत मांडल्या. यावेळी शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सिडको वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास देशमाने उपस्थित होते. या बैठकीत रिक्षा चालक संयुक्त संघर्ष कृती समीतीचे अध्यक्ष निसार अहेमद, मोहंमद बशीर, शेख लतीफ, रमाकांत जोशी, नाहीद फारुकी, राजु देहाडे, इम्रान पठाण, जाकेर पठाण, शेख सरवर, शेख मुनाफ, अमजद पठाण आदी उपस्थित होते.
—————————————————–
बुलेट विक्रीचे आमिष दाखवून सुरक्षारक्षकाला ५० हजारांला गंडविले
औरंंंगाबाद : फेसबुक प्रोफाईलवर रॉयल इन्फिल्ड बुलेट विकण्याची जाहिरात देऊन भामट्याने सुरक्षारक्षकाला ५० हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २३ ऑगस्ट रोजी घडला असून सुनील खोलकम्भ असे भामट्याचे नाव आहे.
अक्षय तोताराम तिरछे (वय २३, रा. नगररोड, गोलवाडी, तिसगाव) हे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांना सुनीलच्या फेसबुक प्रोफाईलवर बुलेट विक्रीची जाहिरात दिसली. तेव्हा अक्षय यांनी सुनीलला फोन करून बुलेट घेण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर सुनीलने ५० हजारात बुलेट देण्याचे मान्य केले. २३ ऑगस्ट रोजी अक्षय यांनी सुनीलला फोनपेद्वारे ५० हजार रुपये जमा केले. मात्र त्यानंतर सुनीलने अक्षयला यांना कोणतेही वाहन दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे अक्षय यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मंगळवारी छावणी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी सुनील विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक पगारे करत आहेत.