AurangabadNewsUpdate : जिओ कंपनीचे सिमकार्ड बंद होतेय असे सांगून , भामट्यांनी चक्क संपादकालाच ३० हजाराला गंडविले !!

औरंंंगाबाद : जिओ कंपनीचे सिमकार्ड बंद होण्याचा मॅसेज पाठवून अॅप डाउनलोड करण्याचे सांगत त्याआधारे एका दैनिकाच्या संपादकाला भामट्यानी ३० हजाराला गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी (दि.७) दुपारी १ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र रांजनीकर हे ज्येष्ठ पत्रकार असून एका दैनिकात संपादक म्हणून कार्यरत आहेत. रांजनीकर यांच्या मोबाईलवर जिओचे सिमकार्ड बंद होणार असल्याचा एसएमएस सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आला. त्यानंतर रांजणनीकर यांनी एसएमएस आलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता, त्यावेळी फोनवर बोलणार्या व्यक्तीने त्यांना एक मोबाईल क्रमांक देत त्यावर संपक साधण्यास सांगितले. रांजणीकर यांनी त्या नंबरवर संपर्क साधला असता, फोनवर बोलणार्या व्यक्तीने टीम व्हिवर क्लिक सपोर्ट अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करण्याचे सांगितले. रांजणीकर यांनी अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यांना एक आयडी क्रमांक आला, तो क्रमांक रांजणीकर यांनी फोनवर बोललेल्या भामट्याला पाठविला, तसेच आपल्या जीओ अॅपवरून बँकेचे कार्ड वापरत रांजणीकर यांनी १० रूपयांचे रिचार्ज केले. त्यानंतर भामट्यांनी त्यांच्या पीजेएसबी सहकारी बँकेच्या खात्यातून २९ हजार ९५० रूपये लंपास केले. हा प्रकार लक्षात आल्यावर राजेंद्र रांजणीकर यांची मुलगी प्रणाली रांजणीकर हिने पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाणे गाठुन भामट्यांविरूध्द तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गिता बागवडे या करीत आहेत.
दोन रेकॉर्डवरील घरफोडे गजाआड, ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त
औरंंंगाबाद : एमआयडीसी वाळूज परिसरात विविध ठिकाणी घरफोड्या करून धुमाकुळ घालणार्या दोन अट्टल घरफोड्यांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांच्या ताब्यातून पोलिसांनी ५ एलसीडी टीव्ही, २ गॅस सिलेंडर, दोन टीव्ही असा एकूण ७५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी कळविली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहेबराव काशिनाथ खरात (वय ३५), प्रशांत प्रकाश निकाळजे (वय २२) दोघेही रा.अजवानगर, वाळूज असे पोलिसांनी अटक केलेल्या घरफोड्यांची नावे आहेत. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गौतम वावळे यांना रेकॉर्डवरील चोरटे असलेल्या साहेबराव खरात व प्रशांत निकाळजे यांच्या घरात चोरीचा मुद्देमाल असल्याची माहिती मिळाली होती. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गौतम वावळे, जमादार वसंत शेळके, खय्युखखॉ पठाण, प्रकाश गायकवाड, सुधीर सोनवणे, रेवननाथ गवळे, नवाब शेख, विनोद परदेशी, धिरज काबलीये, मनमोहनमुरली कोलीमी, बंडू गोरे, दिपक मतलबे, होमगार्डचे जवान संदिप गायकवाड आदींनी साहेबराव खरात व प्रशांत निकाळजे यांच्या घरी छापा मारून ५ एलसीडी टीव्ही, दोन टिव्ही, २ गॅस सिलेंडर असा एकूण ७५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.