Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : अँब्युलन्स न मिळाल्याने नागपुरातही वडिलांपाठोपाठ मुलगाही गेला…

Spread the love

वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने नागपुरातही एका रुग्णाचा बळी गेला असल्याचे वृत्त आहे . विशेष म्हणजे या रुग्णाच्या वडिलांचे दोन दिवसनपूर्वीच कोरोनामुळे निधन झाले होते. याविषयी अधिक माहिती अशी कि,   प्रकृती अस्वस्थ झाल्याने घरच्यांनी मोठ्या विश्वासाने १०८ क्रमांकावर फोन केला. काही वेळातच रुग्णवाहिकाही आली परंतु कोरोनाचा रुग्ण असल्यामुळे रुग्णाला घेऊन जाण्यास त्यांनी असमर्थता दाखवली परंतु  रुग्णाच्या कुटुंबीयांनी विनंती केल्यानंतर त्यांनी रुग्णाची नाडी पाहिली आणि रुग्णाचा मृत झाल्याचे सांगितले, मात्र घरच्यांच्या मते त्यांनी  आलेल्या रुग्णवाहिकेनेच  त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले असते तर प्राण वाचू शकले असते. शनिवारी सकाळी नागपूर शहरात हि घटना घडली .

नागपूर शहरातील जेष्ठ लोहियावादी व गांधीवादी, सामाजिक कार्यकर्ते  हरीष अड्याळकर यांचे गुरुवारी सायंकाळी करोना संसर्गाने निधन झाले . आज  शनिवारी सकाळी मृत्यू झालेली व्यक्ती त्यांचा मुलगा आहे. वडील आणि मुलगा एकापाठोपाठ एक गेल्याने  अड्याळकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आठवडाभरापूर्वीच हरीष अड्याळकर यांना बरे वाटत नसल्याने व मुलगा त्यांना सर्वसाधारण उपचारासाठी डॉक्टरांकडे घेऊन जात असल्याने दोघांनाही करोनाची चाचणी केली व ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे हरीष अड्याळकर यांना ३० ऑगस्ट रोजी (रविवारी) मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तर मुलगा घरीच विलगीकरणात होता. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी हरीष यांचे निधन झाले. त्याचा मोठा धक्का मुलगा नितीन अड्याळकर यांना बसला.

शुक्रवारी दुपारी हरीष यांच्या पार्थिवावर अंत्यंसस्कार झाल्यानंतर सायंकाळी नितीनची प्रकृती अस्वस्थ वाटू लागली. मात्र झोप न झाल्यामुळे तसे वाटत असेल म्हणून औषध घेऊन ते घरीच होते. शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास ते बाथरूमला जाऊन आले व त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यांची ती अवस्था पाहून घरच्यांनी लगेच १०८ या क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका व वैद्यकीय मदतीची मागणी केली. अर्ध्या तासात रुग्णवाहिका आली. मात्र त्यात ना ऑक्सिजन ना सोबत स्ट्रेचर. अड्याळकर कुटुंब वरच्या मजल्यावर राहते. रुग्णवाहिकेत एक महिला डॉक्टर आणि चालक असे दोघेच होते. डॉक्टरांनी नितीन अड्याळकर यांची नाडी तपासली व ते मृत झाले असल्याचे सांगितले, मात्र रुग्णवाहिकेने यांना मेडिकलला घेऊन जा तेथे उपचार होतील तर हे वाचू शकतील, असे कुटुंबाचे म्हणणे होते. डॉक्टर मात्र मनपाच्या झोनची हद्द कुटुंबाला समजवत राहिल्या आणि शेवटी रुग्णवाहिका डॉक्टरसह निघून गेली. त्यानंतर पुन्हा दुसरी रुग्णवाहिका मिळविण्यासाठी कुटुंबीयांची धडपड सुरू झाली. मात्र आयुष्यभर समाजासाठी धावणाऱ्या हरीष अड्याळकर यांच्या मुलासाठी एकही रुग्णवाहिका मिळत नव्हती.

दरम्यान मेडिकलचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांना याबाबत कळताच त्यांनी दुपारी १२.३० च्या सुमारास डॉक्टरांच्या पथकासह एक रुग्णवाहिका पाठवली. मात्र तोवर उशीर झाला होता. त्यानंतर नितीन यांना मेडिकलला नेण्यात आले. तेथे त्यांना अधिकृतपणे मृत घोषित करण्यात आले. पहिली रुग्णवाहिका आली त्यावेळी नितीन जिवंत होते मात्र दुसरी रुग्णवाहिका येईपर्यंत म्हणजे तीन ते चार तासांच्या काळात त्यांची प्राणज्योत मालवली. त्या महिला डॉक्टरने संवेदनशीलता दाखविली असती तर नितीन यांचे प्राण वाचू शकले असते असे घरच्यांना वाटत आहे. ५३ वर्षीय नितीन एका खासगी प्रतिष्ठानात काम करीत होते. त्यांच्या मागे पत्नी, १ मुलगी, १ मुलगा व मोठा आप्त परिवार आहे. शुक्रवारी ज्या मोक्षधाममध्ये पित्यावर अंत्यसंस्कार झाले, त्याच ठिकाणी २४ तासात मुलावर अंत्यसंस्काराची वेळ या कुटुंबावर आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!