Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Spread the love

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी  यांच्यावर लोधी रोड स्थित स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी मुलगा अभिजित मुखर्जी यांनी आपल्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पाडले. करोना प्रोटोकॉलचं पालन करताना प्रणव मुखर्जी यांच्या मृतदेहाला खांदा देणाऱ्यांनीही पीपीई कीट परिधान केले होते. मुखर्जी यांचं पार्थिव शरीर ‘गन कॅरिज’ऐवजी एका गाडीतून  स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आलं. स्मशानभूमीत उपस्थित असणाऱ्यांनीही पीपीई कीट परिधान केले होते. मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात तसंच सैन्याच्या मानवंदनेसहीत अंत्यसंस्कार पार पडले.

प्रारंभी  प्रणव मुखर्जी यांचं पार्थिव १० राजाजी मार्ग, दिल्ली या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. इथं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिन्ही सेनेच्या प्रमुखांसहीत अनेक व्हीआयपी नेत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षणप्रमुख जनरल बिपिन रावत, लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे, वायुसेना प्रमुख आर के एस भदौरिया, नौसेना प्रमुख करमबीर सिंह हेदेखील प्रणव मुखर्जी यांच्या अंत्यदर्शनासाठी हजर झाले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण, हर्षवर्धन, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव डी राजा यांनीही दिवंगत नेत्याचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!