AurangabadCoronaEffect : कोरोनाबाधित पित्याचे निधन होताच , मुलांनी केली डॉक्टरांना आणि नर्सला मारहाण

औरंगाबाद – कोरोनाबाधित पित्याचे निधन होताच मुलांनी एमजीएम रुग्णालयातील महिला डाॅक्टरसह अन्य तिघांना मारहाण केल्याचा गुन्हा सिडको पोलिस ठाण्यात आज पहाटे ३.३०वा.दाखल झाला आहे. मारहाण करणारे आरोपी तीसगावातील रेकाॅर्डवरचे गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. डाॅ.निलोफर बानो इसा पटेल(२८) रा.आॅडिटर सोसायटी हडको तसेच डाॅ. सागर जैस्वाल आणि दोन परिचारिका सरोज अभंग आणि पूजा गायकवाड मारहाण केली.
याविषयीची अधिक माहिती अशी कि , जितेंद्र आणि विजेंद्र प्रभूलाल जैस्वाल या जैस्वाल बंधूंचे वडील प्रभूलाल पापालाल जैस्वाल(७१) यांच्यावर एमजीएम रुग्णालयात कोविड विभागाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु हौते. बुधवारी रात्री ११.३० वा. प्रभूलाल जैस्वाल यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.त्यामुळे संतापलेल्या विजेंद्र आणि जितेंद्र यांनी एमजीएम रुग्णालयात गोंधळ घालत ५० हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान केले व रुग्णालयाच्या महिला डॉक्टरसह इतर एक डाॅक्टर आणि दोन परिचाराकांना मारहाण केली. आरोपी जितेंद्र आणि विजेंद्र प्रभूलाल जैस्वाल रा.तीसगाव हे रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून या दोघांवर वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्यात एकूण दहा गुन्हे दाखल आहेत.त्या पैकी तीन सरकारी कामात अडथळा आणण्याचे गुन्हे आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको पोलिस करंत आहेत.