Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : हृदयद्रावक : पती आणि मुलांना इंजेक्शन देऊन ठार करून महिला डॉक्टरची आत्महत्या

Spread the love

नागपूर शहरात एका डॉक्टर पत्नीने प्राध्यापक पती, मुलगा व मुलीला इंजेक्शन देऊन ठार मारल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्याकेल्याची  धक्कादायक घटना कोराडीतील ओमनगर येथील जगनाडे ले-आऊट येथे आज दुपारी उघडकीस आली. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने उपराजधानी नागपूर मध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, डॉ. सुषमा राणे यांनी पती व मुलांची हत्या करून आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटना घडली तेव्हा त्यांची आत्या प्रमिला या घरात होत्या, पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

याविषयीची अधिक माहिती अशी कि , प्रा. धीरज डिंगाबर राणे (वय ४२), त्यांच्या पत्नी डॉ. सुषमा धीरज राणे (वय ३९), मुलगा ध्रुव धीरज राणे (वय ११), मुलगी लावण्या ऊर्फ वण्या धीरज राणे (वय ५) , अशी मृतकांची नावे आहेत. धीरज राणे हे वानाडोंगरीतील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागाचे विभाग प्रमुख तर डॉ. सुषमा या धंतोलीतील अवंती हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. मयत धीरज यांच्या आत्या प्रमिला (वय ६५) या त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. दुपार झाल्यानंतरही चौघे खोलीतून बाहेर न आल्याने प्रमिला यांनी धीरज यांना आवाज दिला. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर प्रमिला यांनी आरडा-ओरड केली असता शेजारी जमले. एका शेजाऱ्याने सुषमा यांचे भाऊ रितेश सिंग यांना माहिती दिली. माहिती मिळताच ते ओमनगर येथे आले. दरम्यान एका नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत कळविले आणि पोलीस नियंत्रण कक्षाने कोराडी पोलिसांना कळविले. त्यानुसार घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निलोत्पल, कोराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वजीर शेख यांनी घटनास्थळाला तत्काळ भेट दिली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार खोलीचा दरवाजा उघडताच समोरचं दृष्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. धीरज, ध्रुव व लावण्या या तिघांचे मृतदेह पलंगावर पडलेले आढळले तर बाजूलाच पंख्याला डॉ. सुषमा या गळफास लावलेल्या स्थितीत पोलिसांना दिसल्या. पोलिसांनी तातडीने पंचनामा करून चौघांचे मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केले. तूर्त कोराडी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. राणे कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचे वृत्त कळताच नातेवाइकांनी ओमनगर येथे धाव घेतली. सुखी कुटुंबातील चौघांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!