AurangabadNewsUpdate : ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या आवाहनाला गणेश मंडळांचा प्रतिसाद, यंदा सार्वजनिक गणेशोत्सव नाही

औरंंंगाबाद : कोरोना संकटाच्या काळात सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा न करता गणेशोत्सवासाठी जमा होणारी वर्गणी कोरोनाशी सामना करणा-यांना द्यावी असे आवाहन ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले होते. ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत औरंगाबाद जिल्ह्यातील ३९ गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
यंदाच्या वर्षी गणेशोत्सवावर कोरोना विषाणूचे सावट असल्याने जिल्ह्यातील गणेश मंडळांनी सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा करू नये असे आवाहन ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले होते. तसेच गणेशोत्सवासाठी जमा होणारी रक्कम कोरोनाशी सामना करणा-या सामाजिक संस्था, कोव्हीड योध्दा यांना मास्क, सॅनिटायझर, औषधी आदी खरेदीकरून गणेश मंडळाच्या वतीने भेट म्हणून द्याव्यात अशा सूचना देखील त्यांनी केल्या होत्या.
दरम्यान, ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आवाहनाला जिल्ह्यातील कन्नड, गंगापूर शहर, हतनूर, चिकलठाणा, नागद, चापानेर या गावातील ३९ गणेश मंडळांनी प्रतिसाद देत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचे तसेच गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करणार नसल्याचे लेखी स्वरूपात पोलिस स्टेशनला कळविले आहे. तर कन्नड येथील गणेश मंडळाने पोलिस ठाण्यात प्लास्टीक खुर्च्या भेट म्हणून दिल्या आहेत.