Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : महाराष्ट्रातील सर्व व्यवहार सुरळीत करा , लॉकडाऊन मागे घ्या , सार्वजनिक वाहतूक सेवा तातडीने सुरु करा : प्रकाश आंबेडकर

Spread the love

महाराष्ट्रातील सर्व व्यवहार सुरळीत करा , लॉकडाऊन मागे घ्या आणि राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केली. मंदिरे खुली करण्यासाठी सर्व साधुसंतांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. त्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या मागणीला पाठिंबा दिलेला आहे मुंबईत आंबेडकर भवन येथे वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या पेचप्रसंगांवर आपली मते परखडपणे मांडली. या पत्रकार परिषदेला बेस्ट तसेच एसटी महामंडळाच्या युनियनच्या  प्रतिनिधींचीही उपस्थिती होती. 

या पत्रकार परिषदेत मंदिरांबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, आंबेडकर म्हणाले कि , मी स्वतः अकोल्यातील मंदिरे खुले करून आलो आहे. आता त्या ठिकाणी कावडही निघाली आहे. त्यात कोरोनाचा एकही रुग्ण निघाला नाही. साधुसंतांची जी मागणी आहे ती सरकारने मान्य करायला हवी. पंढरपूर येथे संत आंदोलन करणार आहेत. मी देखील त्यांच्या सोबत आंदोलनात उतरणार असल्याचा  शब्द मी त्यांना दिला आहे. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘एसटी महामंडळ व बेस्ट कर्मचाऱ्यांची एक बैठक आज घेण्यात आली होती. बेस्ट शंभर टक्के चालू आहे. ही बातमी खोटी आहे. ज्या लहान बस कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत त्या सर्व बस धावत आहेत. तर बेस्टच्या मालकीच्या केवळ १५ टक्के बस चालू आहेत. कंत्राटदाराच्या बस चालू असल्यामुळे बेस्टचा तोटा होत आहे. याचा खुलासा सरकारने केला पाहिजे.’

दरम्यान राज्यातील एसटी बस सुरु केल्या नाहीत तर त्या नादुरुस्त होण्याची शक्यता आहे आणि तसे झाले तर एसटी महामंडळा चे सरकारकडून खासगीकरण केले जाऊ शकते. त्याच बरोबर एसटी महामंडळामध्ये वाहक चालकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्याबाबत कामगारांना आम्ही काही सूचना केलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी स्वत:हून पुढे येऊन कोणत्याही निर्णयाची वाट न पाहता बस रस्त्यावर आणल्या पाहिजेत, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. राज्यात आंतरराज्य जिल्हा बंदी आहे. ही बंदी तात्काळ उठवून नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात यावी. आतातरी लोकांचे दळणवळण सुरू व्हायला हवे, असे आवाहन आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले. दिल्लीत केवळ मेट्रोसेवा बंद आहेत, मात्र इतर सर्व वाहतूक सुरू आहे तर उत्तर प्रदेशमध्येही परिवहन सेवा सुरू आहेत मग या बाबतीत महाराष्ट्र मागासलेला का दाखवता?, असा प्रश्न आंबेडकर यांनी विचारला. राज्यात लवकरात लवकर सार्वजनिक वाहतूक सुरू न केल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!