AurangabadCrimeUpdate : भंगार व्यवसायिकाचा दाम्पत्याला ७० लाखांना गंडा , बोगस कंपनी टाकून केली अनेकांची फसवणूक

भंगाराच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास नफा देण्याचे आमिष दाखवून कटकट गेट येथील दाम्पत्याला बंटी बबलीने ७० लाखांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे बोगस कंपनी टाकुन या बंटी बबलीने अनेकांना आमिषे दाखवत लुबाडल्याचेही समोर येत आहे. सय्यद मुर्तुझा अली सय्यद मोहंमद मुस्तफा अली त्याची पत्नी आयेशा (रा. सी-३, अथर्व हाऊसिंग सोसायटी, अल्पाईन हॉस्पीटल, बीड बायपास रोड, निशांत पार्कमागे) अशी दोघांची नावे आहेत.
या विषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , कटकट गेट येथील अब्दुल कदीर अब्दुल मजीद शेख (३४, रा. लॅन्डमार्क रेसीडेन्सी, रविंद्रनगर) हे खासगी नोकरी करतात. तर त्यांच्या पत्नी शेख शिरीन या जालन्याच्या जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शिरीन यांची मैत्रिण आयेशा सय्यद व तिच्या पतीसोबत जुनी ओळख आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये सय्यद दाम्पत्य त्यांच्या घरी आले होते. तेव्हा त्यांनी आपला एम. आर. इंटरप्राईजेस नावाने भंगाराचा व्यवसाय असल्याचे सांगत व्हिजीटींग कार्ड दिले. याशिवाय व्यवसायात खूप नफा आहे. तुम्ही माझ्या व्यवसायासाठी पैसे द्या, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नफा होतो. त्यातील काही रक्कम मी तुम्हाला देत जाईल असे सांगितले. त्यानंतर वेळावेळी सय्यदने अब्दुल कदीर यांच्याशी संपर्क साधत त्यांना व्यवसायात पैसे गुंतविण्यासाठी भाग पाडले. त्यानुसार, सुरुवातीला ६ जुलै २०१८ रोजी अब्दुल कदीर यांनी बँक खात्यावरुन आॅनलाईन पाच लाख रुपये सय्यदच्या खात्यावर पाठवले. त्यावेळी त्याने १५ हजार रुपये नफा दिला. ८ आॅगस्ट २०१८ रोजी आणखी पाच लाख रुपये त्याच्या खात्यात जमा केले. त्यावर त्याने ३ सप्टेंबर २०१८ रोजी २८ हजार रुपये दिले. पुढे आणखी गुंतवणूक करायची आहे असे आमिष दाखविल्याने अब्दुल कदीर यांनी १९ आॅक्टोबर २०१८ रोजी आणखी पाच लाख रुपये त्याच्या खात्यात आॅनलाईन जमा केले. १५ जानेवारी २०१९ रोजी देखील पाच लाख जमा केल्यावर जुलै २०१९ मध्ये आपल्याला खूप मोठे काम मिळाले आहे. असे सांगत चार महिन्यांसाठी २५ लाख रुपयांची त्याने मागणी केली. तर त्यातून होणा-या नफ्यापोटी एक लाख १२ हजार पाचशे रुपये देईल असे आश्वासन दिले.
नियमितपणे रक्कम देत असल्याने अब्दुल कदीर यांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यांनी आयसीआयसीआय बँकेकडून पत्नीच्या नावे १५ लाख व स्वत:च्या नावे बजाज फायनान्स कंपनीतून साडेनऊ लाखाचे कर्ज उचलले. तसेच एक लाख रुपयांचे सुवर्ण कर्ज काढले. त्यापैकी सहा लाखाची रक्कम २३ आॅगस्ट २०१९ रोजी सय्यदच्या खात्यावर आॅनलाईन जमा केली. पुढे २६ आॅगस्ट २०१९ रोजी आणखी तीन लाख रुपये दिले. अशाच प्रकारे त्यांनी डिसेंबर २०१९ पर्यंत ४३ लाख रुपये आणि रोख २६ लाख ३६ हजार पाचशे रुपये असे एकुण ६९ लाख ३६ हजार पाचशे रुपये दिले. ही रक्कम डिसेंबर २०१९ मध्ये देणार असल्याचे सय्यदने सांगितले होते. मात्र, त्याने नेहमी वेळ काढू पणा केला.
सय्यद दाम्पत्य हैदराबादला पसार….
मार्च २०२० मध्ये सय्यद दाम्पत्य अचानक कुटुंबासह हैदराबादला पसार झाल्याचे अब्दुल कदीर यांना समजले. त्यानंतर नातेवाईक व ओळखीच्या लोकांना भेटून अब्दुल कदीर यांनी हैदराबादेतील सय्यदचे घर गाठले. त्यावेळी त्याचा साला सय्यद आरीफ व सासू-सास-याने सय्यद हा लॉकडाऊन नंतर तुमचे पैसे देईल असे सांगितले. मात्र, अद्यापही त्याने पैसे दिले नाही. त्यामुळे अब्दुल कदीर यांनी आर्थिक गुन्हे शाखा गाठत तक्रार दिली. त्यावरुन जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक डी.डी. लंके करत आहेत. दरम्यान सय्यद मुतुर्झा याने रेल्वे स्टेशन रोडवरील महानुभाव चौकाजवळ वेलकम ग्रुप या नावाने कार्यालय थाटले होते. त्या कार्यालयाच्या माध्यमातून आमिष दाखवत त्याने अनेक लोकांना गंडविल्याचे समोर येत आहे.