MaharashtraUpdate : क्वारंटाईन सेंटर मधील महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिसांची नियुक्ती आणि सीसीटीव्ही लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी सर्व राज्यातला आढावा घेण्यात आला. या बैठकीत आरोग्य मंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी कोरनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. प्रत्येक गावात आता COVID दक्षता समित्या स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णयही सरकारने घेतला आहे.
महिला रुग्णांसाठी महिला पोलिस सुरक्षा तैनात करणार असून सेंटर्समध्ये सीसीटीव्हीही लावण्यात येणार आहे. पनवेल मधल्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. टोपे म्हणाले, या बैठकीत राज्यातल्या कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. सगळी परिस्थिती लक्षात घेऊन काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात राज्यात यापुढे लॉकडाऊनची वेळ न आणता टप्या टप्याने दैनंदिन व्यव्हार सुरळीत कसे होतील याकडे सरकारचा कल असेल.
राज्यात आता जिल्हा स्तरावर जसे टास्क फोर्स आहेत तसेच आता डेथ ऑडिट किमीटी निर्माण करणार असल्याचं राज्य सरकारने म्हटलं आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक गावांत आता कोविड दक्षता समिती स्थापन करणार असल्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. पनवेल क्वारंटाईन सेंटर मधील घटना दूर्दैवी असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस सुरक्षा वाढवणार असल्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच महिला रुग्णांसाठी महिला पोलिस सुरक्षा तैनात करणार असून सेंटर्समध्ये सीसीटीव्हीही लावण्यात येणार आहे.