AurangabadUpdate : लॉकडाऊन काळात विनाकारण घराबाहेर पडणा-यावर सक्तीने कठोर कारवाई : चिरंजीव प्रसाद

औरंंंगाबाद : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी येत्या १० ते १८ जुलैदरम्यान शहरात सक्तीने लॉकडाऊन करण्यात येणार आहे. सक्तीच्या लॉकडाऊन काळात नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी बुधवारी (दि.८) पत्रकार परिषदेत केले. तसेच कोणी विनाकारण रस्त्यावर फिरत असतांना आढळून आल्यास त्याच्यावर सक्तीने कठोर कारवाई करण्यात येवून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा प्रशासनासमोर अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शहरात लॉकडाऊन करण्यात यावा अशी मागणी लोकप्रतिनिधींच्या वतीने करण्यात आली होती. लोकप्रतिनिधींच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाने १० ते १८ जुलैदरम्यान या काळात सक्तीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. सक्तीच्या लॉकडाऊन काळात शहरातील सर्व व्यावसायीक प्रतिष्ठाने, शहरातील वाळुज एमआयडीसी, चिकलठाणा एमआयडीसी, रेल्वेस्टेशन एमआयडीसी, शेंद्रा एमआयडीसीसह शहरातील सर्व लहान-मोठे उद्योग धंदे बंद राहणार आहेत.
दरम्यान, सक्तीने करण्यात येणा-या लॉकडाऊनच्या काळात शहर परिसरात पोलिसांचा तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शहर पोलिसांसह राज्य राखीव दलाची एक वंâपनी, होमगार्डचे जवान आदींचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण शहरात बीट मार्शलमार्फत आणि पोलिस ठाण्याच्या कर्मचा-यांमार्फत गस्त घालण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासह उपायुक्त मिना मकवाना, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे आदींची उपस्थिती होती.