AurangabadUpdate : घाटी रूग्णालयात औषधीसाठी रूग्णांची अडवणूक , खा. इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप

घाटीच्या अधिष्ठाता डॉ. येळीकर यांना निलंबित करा – खासदार सय्यद इम्तियाज जलील
औरंंंगाबाद : घाटी रूग्णालयाला औषधीची खरेदी करण्यासाठी शासनाकडून कोट्यावधी रूपये मिळतात. असे असतांना रूग्णांना बाहेरून औषधी विकत आणावी लागत आहे. या माध्यमातून गरीब रूग्णांची लुट करण्यात येत असून हा गोरखधंदा घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्यासमोर सुरू असल्याचा आरोप खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी शनिवारी (दि.२७) पत्रकार परिषदेत केला आहे. घाटीत सुरू असलेल्या रूग्णांच्या लुटीला जबाबदार असलेल्या डॉ. कानन येळीकर यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणीही खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी यावेळी केली.
दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी घाटीत औषधीची उपलब्धता आहे का असे मी विचारले होते. त्यावेळी डॉ. येळीकर यांनी आमच्याकडे मुबलक प्रमाणात औषधी उपलब्ध असल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात वेगळेच घाटीत घडत आहे. गंगाखेड येथील शिवकुमार बालाजी मुंडे याच्या पत्नीला प्रसुतीसाठी घाटीत दाखल केले होते. त्यांना उपचारासाठी लागणारी सर्व औषधी बाहेरून विकत आणावी लागली. यासाठी त्यांना साडेसात ते आठ हजार रूपये खर्च झाला. घाटीने एक रूपयाचेही औषध दिले नाही. एवढेच नव्हे तर त्यांना रक्ताच्या बॅगही खासगी ब्लड बँकेतून आणावयास लावल्या. यासाठी घाटीतील डॉक्टर आणि खासगी ब्लड बँकेचे काही सेंटींग आहे का असा प्रश्नही खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या अध्यक्षा देखील डॉ. कानन येळीकर असून त्यांनी गेल्या महिनाभरात टास्क फोर्सची एकही बैठक घेतली नाही. या टास्कफोर्समध्ये मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांच्यासह शहरातील काही प्रमुख खासगी दवाखान्याचे डॉक्टर असल्याचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी यावेळी सांगितले.