MarathwadaNewsUpdate : प्रसिद्ध साहित्यिक कवी किशोर घोरपडे यांचे निधन

जालना शहरातील आंबेडकरी चळवळीतील प्रतिभावंत साहित्यिक किशोर घोरपडे यांचे शनिवारी (ता.२०) सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले,मृत्यूसमयी ते ७८वर्षाचे होते. दलित साहित्य हे जाणीव असलेले साहित्य म्हणून नावारूपास आले आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थितीची आपल्या साहित्यातून मांडणी करणारे साहित्यिक मराठवाड्याने जन्माला घातले आहेत. त्यातील किशोर घोरपडे हे सुद्धा असेच एक साहित्यिक होते. जालना येथील कवी, कथाकार व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते परिचित होते.
भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को या खेडेगावी जन्मलेले किशोर घोरपडे नंतर जालना येथे स्थायिक झाले. महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केल्यानंतर ते वीज मंडळात नोकरीत लागले. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतांना दलित व सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग होता. वीज मंडळात नोकरी संभाळून घोरपडे यांनी सामाजिक भान ठेवून सामाजिक कार्यही केले. शालेय जीवनापासूनच साहित्याची गोडी असल्याने घोरपडे हे लिहिते झाले. तत्कालीन सामाजिक परिस्थिती व संघर्ष तसेच कामगारांचे प्रश्न आदी विषयावर ते लेखन करू लागले. साहित्य लेखन करतांना त्यांनी व्याख्याने, कथाकथन, काव्यवाचनाच्या निमित्ताने अख्खा महाराष्ट्र पायाखाली घातला. विविध दिवाळी अंकाचे त्यांनी यशस्वी संपादनही केले. वीज मंडळातील नवोदित साहित्यिकांना सोबत घेऊन ‘श्रेयस’ ही नाट्य चळवळ सुरू करण्यात घोरपडे यांचा पुढाकार होता. नवोदित साहित्यिकांना संधी देण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे. आंबेडकरी चळवळीला वाहिलेल्या नियतकालिके व वृत्तपत्रातून त्यांनी लेखन केले आहे.
सामाजिक चळवळ आणि समाज प्रबोधन तेवत ठेवण्यासाठी जालना शहरात किशोर घोरपडे यांनी अनेक मेळावे, परिषदा, परिसंवाद घडवून आणले.
संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेली जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या संस्थापकांपैकी ते एक होते. आजही ही व्याख्यानमाला अविरत सुरू असून या व्याख्यानमालेचे अध्यक्ष, सचिवपदी ही घोरपडे यांनी भूषविले.विविध सामाजिक चळवळीच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला होता.
स्नेहल लक्षवेधी’ या टोपण नावाने समाजाचे प्रश्न वृत्तपत्रातून मांडून शासनाचे लक्ष वेधून घेतले. तसेच समाज व सांस्कृतिक प्रबोधनाचे वैचारिक लेखनही त्यांनी वृत्तपत्रातून मांडले . त्यांचा ‘डहाळी हा प्रातिनिधीक काव्यसंग्रह, ‘धग’ हा कथासंग्रह, ‘दलदल’ हा काव्यसंग्रह, ‘घुसमटनी’ हा कथासंग्रह, मालक, सोयरीक, पिंजरा, धम्मक्रांती आदी त्यांच्या ग्रंथसंपदा आहेत. शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश आहे.
किशोर घोरपडे यांचे कथासंग्रह व काव्यसंग्रह हे सामाजिक वास्तवतेचे भान निर्माण करणारे आहेत. सामाजिक अस्मितेचे भान हे त्यांच्या साहित्याचे शक्ती केंद्र होते. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार पुरस्कार’, ‘महानुभाव ग्रंथोतेजक पुरस्कार’, ‘विश्वकर्मा पुरस्कार’, अस्मितादर्श वाड्मय पुरस्कार’, ‘तुका म्हणे वाड्यमय पुरस्कार’ आदी त्यांच्या नावावर आहेत. श्रमिक कष्टकऱ्यांचे दुःख आपल्या साहित्य संपदेतून मांडणारे किशोर घोरपडे हे कसलेले साहित्यिक होते त्यांचे साहित्य हे श्रमिक व कष्टकऱ्यांचे दुःख मांडणारे असले तरी त्यांच्यात नवी उमेद निर्माण करणारेही आहेत. नवोदित साहित्यिकांचे मार्गदर्शक म्हणून आज किशोर घोरपडे यांचे नाव घेतले जाते. आंबेडकरी विचारधारेचे साहित्यिक म्हणून घोरपडे यांचे नाव घेतले जाते.
वास्तवतेचे चित्रण आपल्या साहित्यातून प्रखरपणे मांडणारे किशोर घोरपडे हे मराठवाड्यातील एक प्रतिभावंत साहित्यिक आहेत. पहिल्या राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलनात किशोर घोरपडे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, दोन मुली,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. या ग्रेट साहित्यिकास महानायक ऑनलाईनची भावपूर्ण आदरांजली.
जीवन गौरव पुरस्कार राहून गेला…..!
जालना शहरात १४ व १५ मार्च २०२० रोजी १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.उदघाटक आणि विशेष अतिथी संमेलनास येण्याच्या तयारीला लागले होते. कोरोनाचे काही रूग्ण मुंबई व पुणे शहरात आढळले, शासनाने जिल्हाधिकारी यांना गर्दीचे कार्यक्रम रोखण्याबाबत आदेश काढले आणि हे विद्रोही साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात आले. आपल्या साहित्य चळवळीतील योगदानाबद्दल किशोरदादा घोरपडे यांना याच साहित्य संमेलनात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते. विद्रोही साहित्य संमेलनाचे नियोजनाच्या बैठकीला किशोरदादा आवर्जून उपस्थित राहिले,त्यांनी हे संमेलन दर्जेदार आणि झकास व्हावे,अशा सूचना केल्या. संमेलन कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्याने किशोरदादांचा जीवन गौरव पुरस्कार राहून गेला , याची खंत वाटते अशी प्रतिक्रिया संयोजकांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह पण त्यापूर्वीच केले अंत्यसंस्कार
किशोरदादा घोरपडे यांच्या अकाली निधनाची बातमी समाज माध्यमातून पोहचल्यावर अनेक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येण्यास निघाले होते, आम्हाला विचारणा करीत होते.मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेने कोरोनाच्या भीतीपोटी दादांच्या स्वॅबचा अहवाल येईपर्यंत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करता येणार नाही, अशी अट घातली. दादांनी कोरोनाच काय तर दुर्धर आजारावर मात केली होती.शेवटी त्यांच्या परिवाराने स्वॅबच्या अहवालाची चिंता न करता निकटच्या नातलगांना सोबत घेऊन किशोरदादांवर अंत्यसंस्कार केले.रात्री दादांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला.या भानगडीमुळे दादा वर प्रेम करणाऱ्या अनेकांना त्यांच्या अंत्यदर्शनाला मुकावे लागले!