AurangabadNewsUpdate : माझे आरोग्य माझ्या हाती : राज्यामध्ये MHMH App बनवणारी औरंगाबाद पहिली महानगरपालिका

रुग्णाचे वेळेत निदान आणि उपचारांसाठी ” माझे आरोग्य माझ्या हाती ” अंतर्गत सर्वेक्षण उपयुक्त
औरंगाबाद महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने कोविड-१९ या आजाराने बळी पडणा-या व्यक्तींच्या वयोगटांचा अभ्यास करुन त्यावर उपाय योजना करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत शहरातील प्रत्येक झोन मध्ये कर्मचारी व शिक्षकांच्या मदतीने ” माझे आरोग्य माझ्या हाती ” मोहिमे अंतर्गत एक सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. त्यामध्ये आतापर्यंत शहरातील एकूण ११५ वार्डमधील एक लाख ३४ हजार ३२३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. औरंगाबाद महानगरपालिका राज्यामध्ये ‘ माझे आरोग्य माझ्या हाती ‘ असे अॅप बनवणारी पहिली महानगरपालिका ठरली असल्याची माहिती आप्पासाहेब शिंदे , उपजिल्हाधिकारी तथा कोविड निरिक्षक झोन-६ ,पालक अधिकारी यांनी दिली आहे.
औरंगाबाद मध्ये कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना राबविण्यात येत असून वेळेत रूग्णाचे निदान होणे आणि वेळेवर योग्य उपचार मिळण्यासाठी ‘ माझे आरोग्य माझ्या हाती ‘ या उपक्रमांमुळे शहरातील नागरिकांना व वैद्यकीय यंत्रणेस मोठी मदत होते आहे. या सर्वेक्षणातील ३४ हजार ३२३ घरांमधील पन्नास वर्षांवरील व्यक्तींची संख्या ५७ हजार ४२२ इतकी आहे. तसेच सर्वेक्षण केलेल्या पन्नास वर्षांवरील नागरिकांपैकी ३८ हजार ५४ नागरिकांनी माझे आरोग्य माझ्या हाती अॅप डाऊनलोड करून माहिती भरली आहे.
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी ,मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखालील MHMH App तयार करण्यात आले असुन मनपा व जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या अॅपमूळे ५० वर्षावरील व्यक्ती रक्तदाब, मधूमेह यांनी आजारी असल्यास त्यांना त्वरीत संपर्क करून पूढील वैद्यकीय उपचार सूरू केले जात आहेत. त्यामुळे मृत्युचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे .
या मोहीमेतंर्गत औरंगाबाद महानगरपालिका कर्मचारी वर्ग, शहरातील शालेय स्तरावरील शिक्षक वृंद यांच्या सहायाने नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत असून या तपासणीमध्ये ५० व त्यापुढील वयोगटांच्या नागरिकांकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. तपासणी दरम्यान विभागनिहाय, गल्लीनिहाय, नागरिकांची विहित नमुन्यात माहिती भरून घेतल्या जात आहे. प्रत्येक सर्वेक्षण करणा-या कर्मचा-याला एक ऑक्सीमिटर व थर्मलगण देण्यात आलेली आहे. याद्वारे नागरिकांच्या शरीरांचे तापमान, रक्तांतील Oxygen चे प्रमाण (Spo 2) व नाडीचे ठोके (PR) यांची नोंद घेण्यात येते. त्यामुळे ज्या नागरिकांची वरील पध्दतीने तपासणी केल्यानंतर व्यक्तीचे (Spo 2) चे प्रमाण ९५ पेक्षा कमी असल्यास अशा व्यक्तीस तात्काळ उपचारा संदर्भात वैद्यकीय अधिका-यां मार्फत कार्यवाही करणे करिता किंवा उपचार करणे बाबतच्या सुचना वरिष्ठ स्तरावरुन दिल्या जात आहेत.
सर्वेक्षण करताना, नागरिकांची तपासणी करताना योग्य ते सामाजिक अंतर राहील यांची काळजी घेतली आहे. तसेच प्रत्येक तपासणी वेळेस नागरिकांना सॅनिटायझर देऊन त्यांचे हात निर्जुंतुक करुन ऑक्सीमिटरने नोंदी घेतल्या जातात. याचा नियमितपणे अहवाल ठेवण्यात येत आहे. सर्वेक्षण अहवालातील ५०+ वर्ष वयोगटांची नागरिकांची माहिती, एमएच अॅप वरती अपलोड होणारी माहिती नियंत्रण कक्षा द्वारे नियमित केली जाते व त्या झोन मधील ऑक्सीमिटर + थर्मलमीटर रिडींग मध्ये आयसीएमारने निश्र्चित केलेल्या मानकापेक्षा कमी आढळलेल्या नागरिकांना दुरध्वनीद्वारे संपर्क करुन त्यांच्या तब्बेतीची विचारपुस करणे , समुपदेशन करणे तसेच गरजेनुसार त्या व्यक्तीला हॉस्पीटल मध्ये अॅडमिट होणे करिता सुचना देण्यात येतात.
सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे या कोरोना संकटाला तोंड देत पराभुत करणे शक्य होणार आहे.तरी सर्व पदाधिकारी , सामाजिक संस्था , स्वयंसेवक यांनी सदर माहिमेमध्ये सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.