AurangabadNewsUpdate : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : पीक कर्जासाठी कर्ज वाटप सुरु, ऑनलाईन अर्ज सादर करा -जिल्हाधिकारी उदय चौधरी
औरंगाबाद : खरीप हंगाम २०२० करीता जिल्हयामध्ये बँकातर्फे पीक कर्ज वाटप सुरू आहे . कोविड-१९ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी घोषित करण्यात आलेली आहे. कोरोनो विषाणुच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कोविड -१९ या आजाराचा प्रसार होऊ नये , यासाठी होणाऱ्या गर्दीचे नियमन करण्यासाठी औरंगाबाद जिल्हयातील पिक कर्जासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी http://KCC.setuonline.com/ या संकेतस्थळावरील / लिंकवरील ऑनलाईन अर्ज भरुन पीक कर्ज मागणी नोंदणी करावी . सदरची लिंक aurangabad.nic.in या संकेत स्थळावर देखील उपलब्ध असून शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले आहे.
सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेता यावा तसेच ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा लाभ घेतला आहे परंतु त्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळाला नव्हता अशा सर्व शेतकऱ्यांना या पोर्टलच्या माध्यमातून सदर योजनेचा लाभ घेता येईल. कोणीही शेतकरी किसान क्रेडिट कार्ड योजने पासून वंचित राहू नये यासाठी या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. या लिंकव्दारे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बैंक , औरंगाबाद यांचे मार्फत संबंधीत बँकेकडे पाठविण्यात येणार आहे . या लिंकद्वारे एक आधारकार्ड धारकास एका बँकेतच पिक कर्ज मागणी करता येणार आहे. त्यामुळे आपल्या नजीकच्या बँक शाखेची निवड करावी. सदर यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक शाखेकडून पीक कर्ज घेण्यास पात्र असणा ऱ्या शेतकऱ्यांना लघुसंदेश ( SMS ) पाठविण्यात येणार आहे .
बँकेमार्फत लघुसंदेश ( SMS ) प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बैंकेने दिलेल्या तारखेस त्यांचे आधारकार्ड , ७/१२ , ८. अ , फेरफार नक्कल , पॅनकार्ड , टोचनकाशा , पासपोर्ट साईज २ फोटो , पास बुक या कागदपत्रासह बैंकेत उपस्थित राहावे . अंतिम पीक कर्ज मंजुरी किंवा नामंजुरी बँकेच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल . तसेच सर्व राष्ट्रीयकृत , ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व जिल्हा समन्वयकांनी व शाखाधिकारी यांनी नोंदणी केलेल्या शेतक – यांची यादी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांचे कडून प्राप्त करून घ्यावी असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री चौधरी यांनी केले आहे. त्यानुषंगाने पीक कर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी वरील दिलेल्या संकेतस्थळावर / लिंकवरील फॉर्म भरून पीक कर्ज मागणी नोंदणी करावी. नोंदणीमध्ये काही अडचण आल्यास आपल्या जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधावा ऑनलाईन अर्ज करताना अडचण आल्यास संपर्क करता येईल.