#CoronaVirusUpdate : औरंगाबादमध्ये आणखी एक मृत्यू, 44 रुग्णांची वाढ, एकूण बाधितांची संख्या 602

औरंगाबाद मुकुंदवाडी येथील राम नगरातील 80 वर्षीय कोविड बाधित पुरूष रुग्णाचा आज 11 मे रोजी मध्यरात्री 1.10 मिनिटांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे घाटीचे माध्यम समन्वयक डॉ.अरविंद गायकवाड यांनी सांगितले. यामुळे शहरातील एकूण मृत्यूची संख्या १४ झाली आहे.
घाटी रुग्णालयात ताप, खोकला आणि दम लागत असल्याने त्यांना 8 मे रोजी दुपारी भरती केले होते. त्यांचा 9 मे रोजी कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर 8 मेपासूनच कोविडसाठी अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. जास्त दम लागत असल्याने व शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने त्यांना 10 मेपासून व्हेंटिलेटरवर ठेवले होते. परंतु त्यांचे वय जास्त आणि न्युमोनिआ, श्वसनाचेही विकार असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी कळवले आहे.
जिल्ह्यात 44 कोविडबाधित रुग्णांची वाढ
औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागातील 44 कोविडबाधित रुग्णांची आज सकाळी वाढ झाल्याने आतापर्यंत 602 कोविडबाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्णांचा औरंगाबाद शहरातील (कंसात रुग्ण संख्या) न्याय नगर (02), संजय नगर (01), एसआरपीएफ, सातारा परिसर (01), कोतवाल पुरा (01), एन-4 सिडको (01), सदानंद नगर, सातारा परिसर (08), बीड बायपास रोड (01), भवानी नगर, जुना मोंढा (03), पुंडलिक नगर, गल्ली क्रमांक 06 (01), दत्त नगर-कैलास नगर, लेन क्रमांक 05 (05), कैलास नगर (01), बायजीपुरा (01), राम नगर (06), किल्ले अर्क (08) आणि ग्रामीण भागातील सातारा गाव (01), गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा (03) हा परिसर आहे. या रुग्णांमध्ये 27 पुरूष आणि 17 महिलांचा समावेश असल्याचे मिनी घाटी प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.