#CoronaEffect : Aurangabad NewsUpdate : दहा रिकामटेकड्यांविरुध्द पोलिसांची कारवाई , दुचाकीस्वार, रिक्षाचालक, फळविक्रेत्यांचा समावेश

कोरोना रुग्णांचा आकडा सहाशेवर गेला असताना देखील रिकामटेकड्यांचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. या रिकामटेकड्यांमुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा दहा रिकामटेकड्यांवर पोलिसांनी रविवारी कारवाई केली. त्यात दुचाकीस्वार, रिक्षाचालक, फळविक्रेत्यांचा समावेश आहे.
सिल्लेखाना, हर्सुल टी पॉईंट, जयभीमनगर, बेगमपुरा चौक, जटवाडा रोड, बायजीपुरा, चिकलठाणा अशा भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या भागातील नागरिकांना कंटेन्मेंट झोनमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरी देखील येथील रिकामटेकड्यांमुळे प्रादुर्भाव वाढत आहे. तोंडाला मास्क न लावता तसेच कोणतीही काळजी न घेता हे रिकामटेकडे बिनधास्तपणे फिरत आहेत. त्यांच्यावर रविवारी पोलिसांनी संबंधीत पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले. यात दुचाकीस्वार गोपाळ किसनलाल डोंगरे (४०, रा. बेगमपुरा), शेख जफर शेख मोईन (४०, रा. शहानुरवाडी), मोहम्मद फेरोज मोहम्मद यासीन (५३, रा. अजबनगर, छोटा तकिया), शेख अकील शेख सईद (१९, रा. जाफरगेट, जुना मोंढा), सावंतकुमार लक्ष्मण परदेशी (२९, रा. देवळाई, बीडबायपास), शेख अमीर शेख जाफर (२६, रा. संजयनगर, बायजीपुरा), इम्रान बशीर पठाण (२५, रा. राजनगर, अंबरहिल, जटवाडा रोड), मिलींद धोंडीराम देहेरे (५२, रा. प्रबुध्दनगर, पाणचक्कीजवळ), फळविक्रेता शेख समीर शेख आलम (१९, रा. गल्ली क्र. २०, बायजीपुरा) आणि रिक्षाचालक विठ्ठल विजय मोरे (२६, रा. साईराजनगर, मुकुंदवाडी) यांचा समावेश आहे.
…….
दुध विक्रेत्याविरुध्द गुन्हा
तोंडाला मास्क न लावता सिटीचौकच्या कामाक्षी चौकातजवळ अक्षय मगन चित्ते (२६, रा. जुनाबाजार) हा रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास दुध विक्री करत होता. त्यामुळे तेथे मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी माहिती मिळताच धाव घेऊन अक्षय चित्तेविरुध्द गुन्हा दाखल केला.
……..
क्वारंटाईन तरुणाचा पळ
मुकुंदवाडी, रामनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने तेथील अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी उमेश देविदास काकडे (२९, मुळ रा. बीजरसे, ता. सटाणा, जि. नाशिक, ह. मु. रामनगर) याला क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याची कोरोनाच्या संदर्भाने स्वॅब तपासणी झाली आहे. त्याला कोठेही जाण्यास बंदी असताना रविवारी सकाळी सहाच्या सुमारास तो मुळगावी गेला. याची माहिती मिळताच महानगर पालिकेच्या टास्क फोर्सचे कर्मचारी सिध्दार्थ बनसोडे यांनी काकडेशी संपर्क साधून त्याला माघारी बोलावून घेतले. त्याला पुन्हा क्वारंटाईन राहण्याचे आदेश देण्यात आले असून, त्याच्याविरुध्द मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.