#CoronaEffectAurangabad : मद्य विक्रीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तर इतर व्यवसाय सुरु करण्याबाबत पोलीस आयुक्तांनी घेतली हि भूमिका….

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याच्या हद्दीत कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून आज पासून सुरु झालेल्या लॉक डाऊनच्या तिसरा टप्प्यात कुठलाही बदल करण्यात आला नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे . या शिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळता रेड , ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये सामाजिक अंतर पळून दारू विक्री करता येईल असे सूचित करण्यात आले असले तरी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात पुढील आदेश येईपर्यंत कुठेही मद्य विक्री करता येणार नाही असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सुधारित मनाई आदेशात म्हटले आहे. तर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी यापूर्वी मान्यता दिलेल्या मान्यतेशिवाय इतर कुठल्याही व्यवसायांना सुरु करण्यास परवानगी दिली नसल्याचे गुन्हे शाखेचे आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी कळविले आहे.
या प्रसिद्दी पत्रकात डॉ. कोडे यांनी म्हटले आहे कि , कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सम -विषम रचनेनुसार औरंगाबाद शहर पोलीस दलातर्फे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जागोजागी चौकाचौकात गल्लीबोळात नाकाबंदी पॉईंट व पेट्रोलिंग लावण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील यापूर्वी घोषित केल्या प्रमाणे समता तारखेला वेळ दिल्याप्रमाणे सकाळी सात ते अकरा या वेळेतच नागरिकांना जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी वेळ देण्यात आला आहे याशिवाय कुठलाही बदल करण्यात आलेला नाही असे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर नागनाथ कोडे यांनी कळविले आहे.
यादीबाह्य व्यापारी प्रतिष्ठाने सुरु करण्यास परवानगी नाही
यासंबंधी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात कोडे यांनी पुढे म्हटले आहे की, आज रोजी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे व सचिव लक्ष्मण नारायण साठी हे इलेक्ट्रॉनिक व इतर प्रतिष्ठाने उघडण्याचे निवेदन घेऊन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे आले होते मात्र औरंगाबाद शहरामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व स्तरावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांवर औरंगाबाद जिल्हा व पोलिस प्रशासन ठाम आहे. त्यामुळे पूर्वीच्या आदेशाप्रमाणे देण्यात आलेल्या सवलती शिवाय इतर कुठल्याही व्यापारांना औरंगाबाद शहराच्या हद्दीत परवानगी देण्यात आली नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव औरंगाबाद शहरात कमी झाल्यास यथावकाश इलेक्ट्रॉनिक व इतर प्रतिष्ठाने सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल असेही या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून स्वतःचे रक्षण स्वतः करावे व मास्क न घालता बाहेर पडू नये असे आवाहन चिरंजीव प्रसाद यांनी शेवटी केले आहे.
शहर आणि जिल्ह्यात मद्य विक्री होणार नाही
दरम्यान जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी काल जारी करण्यात आलेल्या मनाई आदेशात सुधारणा करून आज आज सायंकाळी सुधारित मनाई आदेश जारी केला आहे या आदेशातील कलम 9 नुसार संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात ( महानगरपालिका व इतर क्षेत्रात देखील ) मद्य विक्री करणाऱ्या सर्व आस्थापना बंद राहतील त्याचप्रमाणे संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील रेस्टॉरंट मध्येही मद्यसेवन करण्यास मज्जाव राहील असे अधोरेखित केले आहे.
दरम्यान केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि जाहीर केल्यानुसार रेड ऑरेंज आणि ग्रीन या तिन्ही झोनमध्ये कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली होती परंतु औरंगाबाद शहरात आणि जिल्ह्यात दारूविक्री प्रतिबंधित करावी अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकारी पोलिस आयुक्त महापालिका आयुक्त विभागीय आयुक्त यांच्याकडे केली होती. आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आपण दारू विक्रीच्या विरोधात आवाज उठवून आंदोलन करू, प्रसंगी लॉकडाऊन तोडण्यास मागेपुढे पाहणार नाही असा इशारा दिला होता. दारुमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात, दारू न मिळाल्याने कोणाचाही मृत्यू होत नाही या उलट मद्य विक्रीस परवानगी दिल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सहाय्य होईल. शहरात गर्दी वाढेल. या कारणावरून खासदार इम्तियाज जलील यांनी दारूविक्रीला तीव्र शब्दात विरोध केला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आज सुधारित मनाई आदेश जारी करून त्यात मद्यविक्री प्रतिबंध राहील असे नमूद केले आहे.
खासदारांनी मानले जिल्हा प्रशासनाचे आभार
दरम्यान जनतेच्या वतीने आपण प्रशासनास केलेल्या विनंतीचा विचार करून जिल्हाधिकारी औरंगाबाद उदय चौधरी यांनी सुधारित आदेशात मद्य विक्रीस प्रतिबंध असल्याचे नमूद केल्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी “महानायक ऑनलाईन” शी बोलताना जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत. या प्रकरणात जिल्हाधिकारी उदय चौधरी , पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, विभागीय आयुक्त केंद्रेकर, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे आणि जिल्हा पोलीस प्रमुख मोक्षदा पाटील यांच्या समन्यावयामुळे हा महत्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असल्यामुळे मद्यपींचा हिरमोड झाला असला तरी जनहितार्थ हा निर्णय आवश्यक होता असे म्हटले जात आहे.