#CoronaEffect : दिलासादायक मोठी बातमी : लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या पर राज्यातील नागरिकांसाठी केंद्राचा मोठा निर्णय…
अखेर केंद्र शासनाच्या गृह विभागाने लॉकडाउनमुळे विविध राज्यांमध्ये गेल्या ३६ दिवसांपासून अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजुरांना , विद्यार्थ्यांना , पर्यटकांना आणि धार्मिक यात्रेकरूंना आपापल्या घरी जाण्याची परवानगी देणारा मोठा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला असून तसे आदेश आज जरी करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार आता या अडकलेल्या नागरिकांना आंतरराज्यीय प्रवास करता येणार आहे. या नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठवणे , तसेच त्याना राज्यात प्रवेश देण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांना नोडल प्राधिकरणाची स्थापना करावी अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केल्या आहेत.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाने विविध राज्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपापल्या राज्यांमध्ये जाता यावे यासाठी पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.
१. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या कामासाठी नोडल प्राधिकरणाची स्थापना करतील. या प्राधिकरणाचे अधिकारी आपापल्या ठिकाणी अडकलेल्या लोकांची नोंदणी करतील. ज्या राज्यादरम्यान लोक स्थलांतर करणार आहेत, तेथील अधिकारी एकमेकांशी संपर्क साधतील आणि लोक हा प्रवास कसा करतील याबाबत निश्चित धोरण आखतील.
२. ज्यांना जाण्याची इच्छा आहे त्यांची स्क्रीनिंग केली जाईल. त्यांच्यात कोविड -१९ ची कोणतीही लक्षणे न दिसल्यास त्यांना जाण्याची परवानगी दिली जाईल.
३. अडकलेल्या लोकांच्या प्रवासासाठी बसेस वापरल्या जाऊ शकतात. बसेसचे निर्जंतुकीकरण केल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांनुसार लोकांना बसमध्ये बसवले जाईल.
४. कोणतेही राज्य या बसेसना त्याच्या हद्दीत प्रवेश करण्यापासून रोखणार नाही आणि त्यास जाऊ देण्यात येईल.
५. गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत लोकांची तपासणी केली जाईल. बाहेरून आलेल्या लोकांना फिरण्याची परवानगी असणार नाही. त्यांना थेट होम क्वारंटीन व्हावे लागेल. गरज भासल्यास त्यांना रूग्णालयात किंवा आरोग्य केंद्रांमध्ये देखील दाखल केले जाऊ शकते. त्यांची वेळोवेळी तपासणी केली जाईल.
६. अशा लोकांना आरोग्य सेतू हे अॅप वापरावे लागेल. याद्वारे त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाईल.
केंद्र शासनाच्या या आदेशामुळे परप्रांतीयांना आपापल्या राज्यात आणि गावात घरी जाणे शक्य होणार असले तरी राज्यातील अनेक शहरात लॉकडाऊनमुळे अडकलेले विद्यार्थी आपापल्या घरी कसे पोहोचतील ? य प्रश्नाचे उत्तर मात्र या आदेशातून मिळत नसल्याने राज्य शासनालाच याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे असे दिसत आहे . बरेच विद्यार्थी मोटार सायकलवरून किंवा मिळेल त्या वाहनाने अवैध वाहतुकीचा आधार घेऊन आपापल्या गावी परतण्याचा प्रयत्न करीत आहेत.