#CoronaVirus #AurangabadCurrentUpdate : औरंगाबादेत नवीन ३ रुग्ण , रुग्णांची संख्या ५६ वर, सहा जणांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 56 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 23 जण रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) सहा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) 21 अशा एकूण 27 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झालेला आहे.
आज नव्याने तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 56 झाली आहे. नवीन तीन रूग्णांमध्ये टाऊन हॉल परिसरातील व्हीआयपी रोड, नूर कॉलनी येथील पाच वर्षीय बालकास, किलेअर्क येथील 65 वर्षीय महिला, भावसिंगपुरा भीम नगर येथील 16 वर्षीय मुलीचा समावेश आहे.
मिनी घाटीमध्ये आज बायजीपुरा येथील 17 वर्षीय कोरोनाबाधिताची चाचणी निगेटीव्ह आली. त्यामुळे त्या रुग्णास दुपारी मिनी घाटीतून डिस्चार्ज देण्यात आला. परंतु नव्याने तीन पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी पाच वर्षीय बालक, 16 वर्षीय मुलगी या कोरोनाबाधित रुग्णांची मिनी घाटीत भर पडली. त्यामुळे मिनी घाटीत 21 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज एकूण 43 रुग्णांची मिनी घाटीमध्ये तपासणी करण्यात आली. त्यापैकी तिघांना घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला. 23 जणांचे स्वॅब घेण्यात आले. तर 23 कोरोनाबाधित संशयित रुग्ण देखरेखीखाली ठेवण्यात आलेले आहेत, असे मिनी घाटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी कळवले आहे.
घाटीत कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू, एका रुग्णाची भर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) 25 रोजी दाखल करण्यात आलेल्या 60 वर्षीय औरंगाबाद शहरातील किलेअर्कमधील कोरोनाबाधित महिलेचा आज दि.27 रोजी दुपारी 12.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर संध्याकाळी याच परिसरातील अन्य एका 65 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी कळवले आहे.
60 वर्षीय महिला रुग्णास घाटीत 25 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. 25 एप्रिल रोजीच त्यांचा स्वॅब घेण्यात आला व त्याच दिवशी त्यांचा कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. घाटीतील उपचारादरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांचे मृत्यूचे कारण बायलॅटरल न्युमोनाटीस विथ ऍ़क्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिन्ड्रोम ड्यू टू कोविड 19 इन केस ऑफ डायबेटिस मलायटस टाइप टू विथ डायबेटिक नेफ्रोपॅथी, हायपरटेंशन, इस्चेमिक हार्ट डिसिज विथ हायपोथयरॉडिझम असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे. पत्रकावर घाटीच्या अधिष्ठाता डॉ.येळीकर यांच्यासह माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांच्या स्वाक्षरी आहेत.
घाटीच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात आता सहा कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. ज्यामध्ये टाऊन हॉल परिसरातील 70 वर्षीय पुरूष, समता नगरातील 38 आणि 51 वर्षीय पुरूष, दौलताबादच्या बस स्टॉप, छोटी मंडी येथील 53 वर्षीय, औरंगाबाद शहरातील असेफिया कॉलनीतील 39 वर्षीय महिला आणि आज नव्याने पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या किलेअर्क येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे, असे डॉ. गायकवाड यांनी कळवले आहे.
Update 7.30