Aurangabad Crime : चोरट्यांनी जालना रोडवरील बिअर बार फोडले, १ लाख ४३ हजाराची विदेशी दारू लंपास

औरंंंगाबाद : जालना रोडवरील सेव्हनहिल पुलाजवळ असलेल्या ज्योर्तिमय कॉम्पलेक्स येथील बिअर बार फोडून चोरट्यांनी १ लाख ४३ हजार ३५० रूपये किमतीची विदेशी दारू लंपास केली आहे. चोरट्यांनी बिअर बार फोडल्याची घटना २४ एप्रिल रोजी मध्यरात्री १ ते २ वाजेच्या सुमारास घडली. बिअर बार फोडणारे तिन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप सिताराम शिंदे (वय ४९, रा.गजानननगर, हडको-एन-११) यांचे जालना रोडवरील ज्योर्तिमय कॉम्पलेक्स येथे देवदास बिअरबार नावाचे हॉटेल आहे. चोरट्यांनी २४ एप्रिलच्या रात्री हॉटेलच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करून हॉटेलचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करीत विविध ब्रँण्डच्या १ लाख ४३ हजार ३५० रूपये किमतीची विदेशी दारू लंपास केली. चोरट्यांचा हा प्रताप हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा प्रकार लक्षात आल्यावर दिलीप शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर करीत आहेत.