#CoronaAurangabadUpdate : भीमनगर, आरेफ कॉलनीतील कोविड रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

Update 8.40 । जिल्हा माहिती कार्यालय
औरंगाबाद : भीमनगर, भावसिंगपुरा येथील 76 वर्षीय महिलेची प्रकृती बिघडल्याने 21 एप्रिल रोजी सकाळी 7.10 वा. उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकृती अत्यंत गंभीर व कोविड (कोरोना) संशयित असल्याने परत एकदा खबरदारी म्हणून त्यांच्या लाळेचे नमुने मृत्यूनंतर घेण्यात आले होते. सदरील नमुन्याचा 21 एप्रिल रोजी रात्री 8.10 वा. कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच आरेफ कॉलनीतील 60 वर्षीय पुरूष असलेल्या कोरोनाबाधिताचेही 22 एप्रिल (बुधवार) रोजी रात्री 2.50 वाजता उपचारादरम्यान निधन झाल्याचे औषधवैद्यक शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.मिनाक्षी भट्टाचार्य आणि घाटीचे नोडल अधिकारी (माध्यम समन्वयक) अरविंद गायकवाड यांनी सांगितले.
चार दिवसांपासून ताप, दमा आजाराने भीमनगर येथील 76 वर्षीय महिला त्रस्त होत्या. त्यामुळे त्यांना बेशुद्ध अवस्थेत 19 रोजी अपघात विभागात आणले होते. त्यांच्या शरीरात 50 टक्के ऑक्सिजनचे प्रमाण असल्याने अपघात विभागात कृत्रिम श्वासोश्वास सुरू करण्यात आला होता, तसेच कोविड इमारतीतील अतिदक्षता विभागात त्यांना भरती केले होते. तर 19 रोजीच त्यांची कोविड चाचणी केली होती, चाचणी मात्र निगेटिव्ह आली होती. त्यांच्यावर अतिदक्षता विभाग येथे कोविड आजाराचे उपचारही सुरू होते. त्यांना बऱ्याच वर्षांपासून उच्च रक्तदाबाचा त्रास होता.
आरेफ कॉलनीतील 60 वर्षीय कोरोनबाधित 19 रोजी सकाळी 11 वाजता अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तीव्र ताप, अंगदु:खी, खोकला, डोकेदु:खी व दमा या लक्षणांवरून त्यांना कोविड संशयित रुग्ण म्हणून भरती करून घेण्यात आले होते. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण 60 टक्के होते. त्यांना कृत्रीम श्वासावर ठेवण्यात आले होते. 19 रोजी त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. दोन्ही बाजूचा न्यूमोनियाबरोबरच रक्तातील कोऍ़ग्युलोपॅथी वाढल्याने त्यांच्यावर कृत्रीम श्वासाबरोबर इतर सर्व औषधोपचार नियमितप्रमाणे सुरू होते. प्रकृती खालावल्याने बायलॅटरल न्यूमोनिया, श्वसनाचा आजार, कोविडसह कोऍ़ग्युलोपॅथी या आजाराने त्यांचा 22 रोजी मृत्यू झाल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.
घाटीत एक, मिनी घाटीत 15 कोरोनाबाधित
76 वर्षीय महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 36 झाली आहे. त्यापैकी 15 जण बरे होऊन घरे परतले आहेत. 76 वर्षीय महिला, आरेफ कॉलनीतील पुरूषासह आतापर्यंत पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात 15 आणि घाटीत एका अशा एकूण 16 जणांवर उपचार सुरू आहेत.